‘त्या’ सीआयएसएफ जवानाला १० हजार रुपयांचे बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:06 AM2021-05-08T04:06:55+5:302021-05-08T04:06:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बीचक्राफ्ट किंग एअर सी -९० या चार्टड विमानाचे चाक निखळल्याची बाब तत्काळ विमानतळावरील यंत्रणांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बीचक्राफ्ट किंग एअर सी -९० या चार्टड विमानाचे चाक निखळल्याची बाब तत्काळ विमानतळावरील यंत्रणांच्या लक्षात आणून देत मोठा अपघात रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल सीआयएसएफचे जवान रविकांत अवला यांना १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
नागपूरवरून मुंबईच्या दिशेने उड्डाण घेणाऱ्या हवाई रुग्णवाहिकेचे चाक निखळून खाली पडल्याची बाब रविकांत यांच्या तीक्ष्ण नजरेने हरली. त्यांनी तत्काळ ही बाब नागपूर विमानतळावरली यंत्रणेच्या कानावर घातली. त्यानंतर सतर्क झालेल्या यंत्रणांनी मुंबई एटीसीला हा प्रकार सांगितला. विमानातील इंधन टाकी रिकामी करून बेली लँडिंग अर्थात विमान पोटावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. यंत्रणांची सतर्कता आणि वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे विमानाचे सुखरूप लँडिंग करण्यात आले; परंतु रविकांत यांनी वेळीच ही बाब पाहिली नसती तर मोठा अनर्थ घडला असता.
हवालदार रविकांत अवला यांची सतर्कता आणि कर्तव्यनिष्ठा लक्षात घेऊन सीआयएसएफचे महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी त्यांनी १० हजार रुपयांचे बक्षीस आणि प्रशस्तिपत्रक जाहीर केले, अशी माहिती सीआयएसएफकडून देण्यात आली.
..........................