Join us

तांदूळ महोत्सवात सव्वातीन कोटींची उलाढाल!

By admin | Published: March 01, 2015 10:55 PM

उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेतून ठाणेकरांना माफक दराने उत्तम दर्जाचा तांदूळ उपलब्ध करून देण्यासाठी तीन दिवसांपासून ठाणे शहरात सुरु

ठाणे : उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेतून ठाणेकरांना माफक दराने उत्तम दर्जाचा तांदूळ उपलब्ध करून देण्यासाठी तीन दिवसांपासून ठाणे शहरात सुरु असलेल्या तांदूळ महोत्सवाच्या रविवार या शेवटच्या दिवसापर्यंत सुमारे सव्वातीन कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. दरम्यान, पडलेल्या अवेळी पावसामुळे मंदावलेल्या ग्राहकांनी दुपारनंतर जोरदार मुसंडी घेतली. व्यापारी, दलाल यांचा अडथळा दूर करून तांदळासह शेती मालाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांचा माल या महोत्सवात सरळ ग्राहकाला विकला आहे. आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुमारे साडेसात हजार क्विंटल तांदूळ ठाणेकरांनी माफक दराते विकत घेतला आहे. यामध्ये इंद्रायणी, मुरबाड झिनी, वाडा कोलम, रत्ना, जया कर्जत, गुजरात ११ आदी सुमारे ३५ प्रकारचा तांदूळ या वेळी विक्रीला ठेवण्यात आला. उत्तम दर्जाचा हा तांदूळ शेतकऱ्यांनी ३५ रुपयांपासून ते ५५ रुपये किलो दराने विकल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक महावीर जंगटे यांनी लोकमतला सांगितले.तीन दिवसांच्या या कालावधीत सुमारे ४५ हजार ग्राहकांनी उन्नती गार्डनमधील या महोत्सवाला भेट दिली. ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी या महोत्सवात सहभाग घेतला. जिल्ह्यातील सुमारे एक लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर तांदळाचे उत्पादन घेणाऱ्या बहुतांशी सधन शेतकऱ्यांनी यात सहभाग घेऊन सरळ ग्राहकांनाच माल विकला. यामुळे दलाल, व्यापारी यांचे धाबे दणाणले आहेत. या वेळी नागली, वरी, हळद, मिरची, मूग, वाल, पांढरा कांदा, आळूची पाने आदींसह ताजा भाजीपाला ठाणेकरांना उपलब्ध करून दिला. (प्रतिनिधी)