राइस पुलर धातूच्या नावे फसवणूक; चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 02:25 AM2020-03-04T02:25:36+5:302020-03-04T02:25:40+5:30
बास्वराज तलवार (३६), गुरुहरन सिंग उर्फ राजा चौहान (४८), संतोष सूर्यकुमार (३७) आणि मोहन जयचांद्रप्पा (४३) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
मुंबई : राइस पुलर धातूच्या नावाने फसवणूक करणाऱ्या चौघांच्या टोळीला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाची बनावट कागदपत्रे, स्टॅम्प आणि लेटरहेड हस्तगत केले असून, सर्वांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बास्वराज तलवार (३६), गुरुहरन सिंग उर्फ राजा चौहान (४८), संतोष सूर्यकुमार (३७) आणि मोहन
जयचांद्रप्पा (४३) अशी अटक आरोपींची नावे आहेत. कॉपर इरिडियम राइस पुलिंग धातू परदेशी नागरिकांना विकल्यानंतर मिळालेले ३९
हजार कोटी रुपये रिझर्व्ह बँकेत जमा झाले आहेत. ही रक्कम मिळविण्यासाठी आम्हाला २० कोटी रुपये बँकेला टॅक्सच्या स्वरूपात
द्यायचे आहेत, असे सांगत ती रक्कम तुम्ही दिल्यास तुम्हालाही त्याचा फायदा होईल, असे आमिष तक्रारदाराला फोनद्वारे दाखविण्यात
आले होते. मुख्य म्हणजे आरबीआयची बनावट कागदपत्रे, लेटरहेड आणि स्टॅम्पदेखील त्यांच्याकडे होते. तक्रारदाराने याबाबत सतर्क होत याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लावलेल्या सापळ्यानुसार, तक्रारदाराने आरोपींना १० लाख रुपये घेण्यासाठी हॉटेलमध्ये
बोलावले. पैशांच्या आमिषाने चौघेही त्या ठिकाणी आले. मात्र हॉटेलमध्ये न येता त्यांनी तक्रारदारास हॉटेलबाहेर बोलावले. माने यांच्या पथकाने रस्त्यावरच सापळा रचून आधी दोघांना आणि त्यांच्या चौकशीतून उर्वरित अन्य दोन साथीदारांना अटक केली. त्यांच्या चौकशीत फसवणुकीच्या उद्देशाने कंपनीही त्यांनी सुरू केल्याचे उघडकीस आले आहे. स्थानिक न्यायालयाने त्यांना ५ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.