लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोपानिमित्त ‘माझी माती- माझा देश’ अभियान राबविले जात आहे. याचा एक भाग म्हणून १३ ते १५ ऑगस्टपर्यंत मुंबईत ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी पालिकेने स्वतः राष्ट्रध्वज खरेदी करून सर्व मुंबईकरांना घरोघरी पोहोच केले होते. यंदा मात्र मुंबईतील डाक कार्यालये आणि रेल्वेस्थानकांतून राष्ट्रध्वज विकत घेण्याचे आवाहन पालिकेने मुंबईकरांना केले आहे.
देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ गेल्या वर्षभरापासून साजरा केला जात आहे. यानिमित्ताने ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाने अमृत महोत्सवाची सांगता होत आहे. या अभियानात शिलाफलकम, पंचप्रण (शपथ), वसुधावंदन, वीरांना वंदन, ध्वजवंदन, मिट्टी यात्रा, असे उपक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. अभियानाचा एक भाग म्हणून १३ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ म्हणजेच ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमदेखील राबविण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात प्रत्येक घर, प्रत्येक इमारत, तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय आस्थापना, खासगी आस्थापना, विविध संस्था, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. १३, १४ आणि १५ ऑगस्ट या तीन दिवशी नागरिकांना आपल्या घरी/ इमारतीवर दिवसा व रात्री राष्ट्रध्वज फडकवता येईल.राष्ट्रध्वज खरेदी करता येणार
- ज्यांच्याकडे राष्ट्रध्वज नाही, त्यांना ध्वज खरेदी करण्याची सुविधा विविध माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. - मुंबईत सुमारे २२४ डाक कार्यालयांमध्ये (पोस्ट ऑफिस) शासनाने निश्चित करून दिलेल्या दराने राष्ट्रध्वज खरेदी करता येणार आहेत.- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, वांद्रे, बोरीवली, लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला येथे राष्ट्रध्वज खरेदी करता येईल.