लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्राला इतिहासाचा समृद्ध वारसा लाभला आहे. हा इतिहास हिंदीत भाषांतरित झाल्यास देशाला त्याचा लाभ होईल, असे सांगत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याच्या इतिहासाच्या हिंदी भाषांतराची आवश्यकता व्यक्त केली.
इंग्रज, फ्रेंच, डच व पोर्तुगीज अशा परकीय सत्तांना आपले दस्तक (परवाने) घेण्यास बाध्य करणारे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आंग्रे घराण्याचा इतिहास असलेल्या ‘कुलाबकर आंग्रे सरखेल : आंग्रे घराण्याचा इतिहास’ या पुस्तकाच्या पुनर्मुद्रित आवृत्तीचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते रविवारी राजभवन येथे झाले. दामोदर गोपाळ ढबू यांनी लिहिलेले हे पुस्तक प्रथम १९३९ साली प्रसिद्ध झाले होते. त्याचे पुनर्मुद्रण केले. प्रकाशन सोहळ्याला कान्होजी आंग्रे घराण्याचे वंशज रघुजीराजे आंग्रे, भैरवीराजे आंग्रे, चंद्रहर्षा आंग्रे, आंतरराज्य छात्र जीवन दर्शन प्रकल्पाचे अध्यक्ष अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते. या पुस्तकात मराठा आरमाराचा १५० वर्षांचा इतिहास, आंग्रे कालखंडातील समाज जीवन, न्यायव्यवस्था, व्यापार, युद्धजन्य परिस्थिती आदी घटनांचा ऊहापोह असल्याचे रघुजीराजे आंग्रे म्हणाले. नवीन आवृत्तीचे पुनर्लेखन व संपादन दीपक पटेकर, संतोष जाधव व अंकुर काळे यांनी केले असून श्री समर्थ सेवा प्रकाशन, नाशिक यांनी हे पुस्तक प्रकाशित केले.