Join us

दंड चुकविण्याच्या नादात रिक्षाचा अपघात; चालकासह प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 3:04 AM

मोबाइलवर बोलत चाललेल्या रिक्षाचालकाला पोलिसांनी हटकले. त्यावेळी दंड वसूल करतील या भीतीने त्याने पळ काढला. याच भरधाव वेगात रिक्षा उलटल्याने चालकासह प्रवासी जखमी झाल्याची घटना पवईत घडली.

मुंबई : मोबाइलवर बोलत चाललेल्या रिक्षाचालकाला पोलिसांनी हटकले. त्यावेळी दंड वसूल करतील या भीतीने त्याने पळ काढला. याच भरधाव वेगात रिक्षा उलटल्याने चालकासह प्रवासी जखमी झाल्याची घटना पवईत घडली. पवई पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.वाहतूक पोलीस शिपाई पंकज निकम (३१) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास निकम अन्य सहकाऱ्यांसोबत पवईत वाहतुकीचे नियोजन करत होते. दरम्यान एक रिक्षाचालक पवईच्या दिशेने मोबाइलवर बोलत येताना दिसला. निकम यांनी त्याला थांबण्याचा इशारा दिला. त्याने पोलिसांच्या अंगावर गाडी चढविण्याचा प्रयत्न करत पळ काढला. वेगावरील नियंत्रण सुटल्याने काही अंतरावर गेल्यानंतर त्याची रिक्षा उलटली. पोलिसांनी त्याला बाहेर काढले. दोन प्रवासीही यात जखमी झाले. रणवीर भगवानसिंह खटाने असे चालकाचे नाव आहे. त्याच्यासह जखमी प्रवाशांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

टॅग्स :अपघात