Join us

मुंबई महानगर क्षेत्रात १ मार्चपासून रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना काळ आणि त्यापाठोपाठ इंधनाच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना काळ आणि त्यापाठोपाठ इंधनाच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या १ मार्चपासून ही भाडेवाढ लागू होणार असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी या संदर्भातील पत्रकार परिषदेत सांगितले. सहा वर्षांनंतर रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढ करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणच्या बैठकीत रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला होता. तसा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविला होता. या भाडेवाढीला मान्यता देण्यात आल्याचे परिवहनमंत्र्यांनी सांगितले. त्यानुसार रिक्षाचे पहिल्या टप्प्याचे भाडे १८ रुपयांवरून २१, तर टॅक्सीचे २२वरून २५ रुपये करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यानंतर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी रिक्षाचे भाडे १४.२० रुपये, तर टॅक्सी भाडे १६.९३ रुपये करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी रिक्षाचे भाडे २.०१ रुपयाने, तर टॅक्सीचे भाडे २.०९ रुपयांनी वाढले आहे.

येत्या १ मार्चपासून भाडेवाढ लागू होणार आहे. मात्र, मीटर कॅलिब्रेशनसाठी तीन महिन्यांचा अवधी लागतो. त्यामुळे ३१ मेपर्यंत दरपत्रकाच्या आधारावर भाडे आकारण्याची मुभा असेल. या कालावधीत सर्व रिक्षा-टॅक्सीचालकांनी मीटर कॅलिब्रेट करून घ्यावे. १ जूनपासून मात्र मीटर रीडिंगनुसार भाडे घ्यावे लागणार असल्याचे परिवहनमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सहा वर्षांपूर्वी रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला होता. भाडेवाढीसंदर्भात खटुआ समितीने जे निकष ठरविले आहेत त्यानुसारच भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे परिवहनमंत्र्यांंनी सांगितले. लाॅकडाऊनच्या काळात परिवहन विभागाने वाहतूक क्षेत्रातील विविध घटकांना करमाफीच्या माध्यमातून दिलासा दिला होता. मात्र, रिक्षा-टॅक्सीचालकांकडून आधीच एकरकमी कर वसूल केला जातो. त्यामुळे त्यांना तशी सवलत देता आली नाही. रिक्षा-टॅक्सीचालकही समाजातील छोटा घटक आहे, त्यालाही भाडेवाढीच्या माध्यमातून दिलासा देण्याचे काम राज्य सरकारने केल्याचा दावाही परिवहनमंत्र्यांनी केला. शिवाय, खटुआ समितीच्या शिफारसीनुसार ५० पैशांपेक्षा अधिकची वाढ असेल तर दरवर्षी जूनमध्येच ती द्यावी लागते. मात्र, मागील सहा वर्षांत भाडेवाढ देण्यात आली नव्हती. ही भाडेवाढ देय होती, असेही ते म्हणाले. याशिवाय, पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या दरांचाही या भाडेवाढीत मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

* शेअर रिक्षाच्या भाड्यातही होणार बदल

रिक्षा-टॅक्सीचे नवीन भाडे जाहीर झाल्यानंतर शेअर रिक्षा आणि टॅक्सीच्या दरातही त्या अनुषंगाने वाढ केली जाईल. वाहतूक विभागाकडून संबंधित दर निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे परिवहनमंत्र्यांनी सांगितले.

* अधिवेशनापूर्वी राज्यपाल नियुक्त आमदारांचा निर्णय घ्यावा

अधिवेशनापूर्वी राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती व्हावी. विधानसभा अध्यक्षांबाबत राज्यपालांनी जशी सूचना केली तशीच सूचना करण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला आहे. त्यानुसार मंत्रिमंडळ पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेईल, असे परिवहनमंत्र्यांनी सांगितले.

* विरोधकांच्या आरोग्याचीही आम्हाला काळजी

राज्य सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी करून पळ काढत असल्याचा आरोप परब यांनी फेटाळून लावला. आम्हाला विरोधी नेते, आमदारांच्या आरोग्याची काळजी आहे. शिवाय, अधिवेशन कालावधीचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत होतो. या समितीत विरोधी पक्षांचे नेतेही असतात. तोच निर्णय बंधनकारक असतो, असेही परिवहनमंत्री परब म्हणाले.

* सीएनजी रिक्षाचीही भाडेवाढ

मुंबई, ठाणे परिसरात अडीच ते पावणेतीन लाख रिक्षा आहेत. त्यापैकी अंदाजे ९७ टक्के रिक्षा सीएनजीवर चालतात. मात्र पेट्रोल, डिझेल दरवाढ झाल्यानंतर सीएनजी दरात वाढ झाली नसतानाही सीएनजी रिक्षांची भाडेवाढ करण्यात आल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.