रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीमुळे त्रस्त (प्रतिक्रिया)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:06 AM2021-02-24T04:06:30+5:302021-02-24T04:06:30+5:30

मुंबई : इंधन दरवाढीमुळे त्रासलेल्या जनतेला आता रिक्षा-टॅक्सीच्या झालेल्या भाडेवाढीमुळे अजून एक धक्का बसला आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अनेक कुटुंबांचे ...

Rickshaw and taxi fare hike (reaction) | रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीमुळे त्रस्त (प्रतिक्रिया)

रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीमुळे त्रस्त (प्रतिक्रिया)

Next

मुंबई : इंधन दरवाढीमुळे त्रासलेल्या जनतेला आता रिक्षा-टॅक्सीच्या झालेल्या भाडेवाढीमुळे अजून एक धक्का बसला आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक बजेट बिघडले आहे. मागील काही महिन्यांपासून अनेकांच्या नोकरी व उद्योगधंद्यांवर परिणाम झाल्यामुळे घरगाडा चालवावा कसा, असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा राहिला आहे. गॅसचे दर वाढल्यामुळे याआधीच गृहिणींमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा पसरली आहे. त्यात १ मार्चपासून रिक्षा आणि टॅक्सीचे किमान भाडे तीन रुपयांनी वाढणार असल्याने आता आम्ही नेमके जगावे तरी कसे, असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे.

योगेश पडवळ - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कंपनीने पगारात आधीच ५० टक्के कपात केली आहे. यामुळे घरखर्च कसा चालवावा, हा प्रश्न नेहमी पडतो. त्यात आता दिवसेंदिवस सर्व वस्तूंचे भाव वाढत चालले आहेत. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ ही सर्वसामान्यांसाठी त्रासदायक आहे. प्रशासनाने इंधनाचे दर कमी करावेत अन्यथा सर्वसामान्य नागरिक याविरोधात आवाज उठवतील.

गणेश देशमुख - सर्वांत जास्त महाग हे पेट्रोल आणि डिझेल झाले आहे. या तुलनेत सीएनजीच्या दरांमध्ये जास्त वाढ झालेली नाही. मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व रिक्षा आणि टॅक्सी या सीएनजीवर चालतात. असे असूनही रिक्षा आणि टॅक्सीच्या दरांमध्ये तीन रुपये भाडेवाढ ही काही प्रमाणात जास्त आहे. प्रशासनाने याचा विचार करून ही भाडेवाढ रद्द करावी.

सुहास नागवेकर - घरातून रेल्वे स्थानक आणि रेल्वे स्थानकावरून घर गाठण्यासाठी आता खिशात शंभराची नोट कायमच तयार ठेवावी लागणार आहे. आजही बस आणि रेल्वेमधून प्रवास करण्यास भीती वाटत असल्याने अनेकदा रिक्षाचा पर्याय निवडावा लागतो. परंतु आता ही भाडेवाढ सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारी आहे. सरकारने लवकरात लवकर पावले उचलून महागाईवर नियंत्रण आणायला हवे.

हितेंद्र सोलंकी - माझी स्वतःची रिक्षा असल्याने ही भाडेवाढ माझ्यासाठी काही प्रमाणात दिलासा देणारी आहे. कोरोनामुळे रिक्षा आणि टॅक्सी व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. आता हळूहळू पुन्हा एकदा प्रवाशांची संख्या वाढल्याने दिवस संपेपर्यंत बऱ्यापैकी कमाई होत आहे. किमान भाडे वाढवायला हवे, ही आम्हा रिक्षा आणि टॅक्सी चालकांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती.

विनय कदम - दुचाकीमध्ये पेट्रोल भरणे परवडत नसल्याने आता रेल्वेने प्रवास सुरू केला आहे. घरापासून रेल्वे स्थानक गाठण्यासाठी रिक्षामागे दररोज पन्नास रुपये खर्च होतात. आता किमान भाडे तीन रुपयांनी वाढविल्यामुळे या खर्चात अजून भर पडणार आहे. कोणत्याही दरवाढीचा त्रास हा श्रीमंतांना होत नसून तो नेहमी सर्वसामान्य गरीब जनतेला होतो. सरकारने जनतेची पिळवणूक थांबवावी.

तेजस्विनी सातपुते - रिक्षा व टॅक्सी चालक याआधीदेखील मीटरमध्ये फेरफार करून जास्तीचे भाडे आकारत होते. आता भाडेवाढ झाल्यानंतर तरी फेरफार थांबवावी. सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यावे. तसेच प्रत्येक वेळी होणारी दरवाढ सरकारने थांबवायला हवी. किंबहुना आताची ३ रुपयांची भाडेवाढ रद्दच करावी.

मेघा तायडे - मुंबईतील रेल्वे स्थानक, टर्मिनस, बस डेपो येथे उभ्या असणाऱ्या रिक्षा व टॅक्सी चालकांकडून दर वेळेस प्रवाशांची लूट होत असते. अनेक रिक्षावाले हे विनामीटर भाड्यासाठी आग्रही असतात. जर रिक्षावाल्यांना प्रवाशांची ने-आण मीटरविना करायची असल्यास मीटर हवेतच कशाला? वाहतूक विभागाने या समस्येकडे लक्ष द्यावे.

विद्या देसाई - एलपीजी गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. त्यात आता सामान खरेदीसाठी उपयोगात येणारी रिक्षा आणि टॅक्सीच्या दरांमध्ये तीन रुपयांनी वाढ झाल्यामुळे खर्चाचा अधिक भार पडणार आहे. सर्वसामान्य माणसांनी जगावे तरी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संध्या लोखंडे - केंद्र सरकार व राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांना चांगले दिवस दाखविण्याचा वादा केला होता. मात्र सध्या होत असलेली भाडेवाढ लक्षात घेता हेच का ते अच्छे दिन, असा प्रश्न या सरकारला विचारावा लागत आहे. ही दरवाढ अशीच सुरू राहिली तर काही दिवसांत मुंबई सोडून गाव गाठावे लागेल. सरकारने शहरातील सर्वसामान्यांचा विचार करायला हवा.

अश्विनी माळी - पेट्रोल आणि डिझेलच्या दराने शंभरी गाठली असतानाच आता प्रशासनाने रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ केली आहे. ही गोष्ट म्हणजे सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. प्रशासनाने सर्वसामान्यांचा अंत पाहणे आता बंद करायला हवे. नाहीतर, एक दिवस सर्वसामान्यांचा उद्रेक प्रशासनाला पाहायला मिळेल.

Web Title: Rickshaw and taxi fare hike (reaction)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.