Join us

रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास १ ऑक्टोबर पासून महागणार, जाणून घ्या दरवाढ

By नितीन जगताप | Published: September 23, 2022 7:30 PM

रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास १ ऑक्टोबर पासून महागणार आहे. 

मुंबई: सीएनजीचे दर वाढल्याने रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याची रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांची मागणी राज्य सरकारने अखेर मान्य केली आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत या भाडेवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. रिक्षाचे पहिल्या टप्प्यातील किमान भाडे २१ रुपयांवरून २३ रुपये, तर टॅक्सीचे भाडे २५ रुपयांवरून २८ रुपये करण्यात आले आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये सीएनजीच्या दरात टप्प्याटप्प्याने ४९ रुपयांवरून ८० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटना भाडेवाढीची मागणी करत होते. यापूर्वी मार्च २०२१ मध्ये रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात आली होती.

सीएनजीच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने मागील अनेक दिवस रिक्षा आणि टॅक्सी चालक भाडेवाढीची मागणी करत होते. या मागणीसाठी येत्या सोमवारपासून संपावर जाण्याचा इशाराही संघटनांनी दिला होता. त्यापूर्वी शुक्रवारी मंत्री उदय सामंत यांच्याकडे रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत भाडेवाढीबरोबरच संघटनांच्या १८ मागण्यांवर चर्चा झाली. त्यापैकी १६ मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी बैठकीत सांगितले. या बैठकीत संप मागे घेण्याची तयारी संघटनेने दर्शवली आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन केले जाणार असून त्यासाठी सरकारकडून १०० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबईऑटो रिक्षाटॅक्सी