टॅक्सीनंतर रिक्षा संघटनेची भाडेवाढीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 03:33 AM2019-06-09T03:33:25+5:302019-06-09T03:33:44+5:30
विधानभवनावर मोर्चा । परिवहनमंत्र्यांकडे निवेदन
मुंबई : गेल्या पाच वर्षांत भाडेवाढ झाली नाही, असे सांगत कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाने भाडेवाढीची मागणी केली आहे. या मागणीसाठी रिक्षाचालक १८ जून रोजी विधानभवनावर मोर्चा काढणार आहेत. काही दिवसांपूर्वी टॅक्सीच्या किमान भाड्यात तब्बल ८ रुपयांनी वाढ करण्यात यावी, अशी मागणी मुंबई टॅक्सीमेन्स संघटनेने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली
होती.
रिक्षाच्या भाडेवाढीबाबत कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपासून रिक्षाची भाडेवाढ करण्यात आली नाही. सीएनजीच्या दरांमध्ये वारंवार वाढ केली जात आहे. रिक्षामध्ये सीएनजी किट वापरले जाते. त्यावर वाहतूक विभागाचे नियंत्रण नाही. दुकानदार रिक्षाचालकांची लूट करतात. रिक्षात वापरल्या जाणाऱ्या सिलिंडर किटचे दर गेल्या आठवड्यामध्ये १८०० रुपये होते, चार दिवसांनी २२०० रुपये झाले़ शनिवारी हा दर २५५० वर पोहोचला आहे. बाटला पासिंग दर तीन वर्षांनी करण्यात यावी याची सक्ती वाहतूक विभागाकडून केली जाते. किट नसेल तर पासिंग थांबविली जाते. या दुकानदारांना वाहतूक विभागाने दर ठरवून द्यायला हवेत. अन्यथा त्यासाठी पासिंग थांबवू नये, असे पेणकर म्हणाले. रिक्षा महामंडळ स्थापन केल्यास रिक्षाचालकांचे जीवनमान उंचावेल़ परंतु महामंडळ स्थापण्याचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे.
रिक्षावाल्यांना भाडेवाढ नको
ओला, उबरसाठी नियम आवश्यक आहेत. या कंपन्या कमी दरात सुविधा देतात. आता जर रिक्षा किंवा टॅक्सीची भाडेवाढ केली तर ग्राहक ओला, उबरला पसंती देईल. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीचालकांचे नुकसान होईल.रिक्षाचालक असो किंवा टॅक्सीचालक असो कोणालाही भाडेवाढ नको आहे. - के.के. तिवारी, मुंबई अध्यक्ष स्वाभिमान रिक्षा-टॅक्सी संघटना