Join us  

रिक्षा व्यवसायास शिस्त लागणार?

By admin | Published: May 24, 2014 1:43 AM

वाशी रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी सुरुवात केली आहे.

नवी मुंबई : वाशी रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी सुरुवात केली आहे. सकाळी व सायंकाळी वाहतूक पोलीस उभे राहून रिक्षाचालकांना वाहने स्टँडमध्ये उभी करण्यास सांगत आहेत. परंतु पोलिसांनी पाठ फिरविताच काही चालक पुन्हा रोडवर रिक्षा उभ्या करत आहेत. शहरातील बेशिस्त रिक्षा चालकांविषयी लोकमतने आवाज उठविताच पोलीस व आरटीओ प्रशासन खडबडून जागे झाले आहे. काही ठरावीक रिक्षा चालकांच्या घाईमुळे प्रामाणिक रिक्षा चालकांची प्रतिमा मलीन होत असून त्यांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणले होते. रेल्वे स्टेशन परिसरात वाहतुकीची ही समस्या सोडविण्यासाठी फक्त दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा रिक्षा संघटना व चालकांना विश्वासात घेवून शिस्त लावण्याचा प्रयत्न करावा. रिक्षा रांगेत उभ्या राहिल्या तर सर्व चालकांना समान व्यवसाय करता येईल. शिवाय प्रवाशांना व वाहतुकीसही अडथळा निर्माण होणार नाही असे मत नागरिकांनी व्यक्त केले होते. दोन दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी याठिकाणी उभे राहून रिक्षा रांगेत उभ्या करण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना प्रामाणिक रिक्षा चालक प्रतिसाद देत आहेत. परंतु पोलिसांनी पाठ फिरविली की काही चालक पुन्हा रोडवर वाहने उभी करून वाहतूक कोंडी करत आहेत. किमान आठ दिवस सकाळ ते सायंकाळपर्यंत पोलिसांनी याठिकाणी थांबून शिस्त लावावी व रिक्षा संघटनांच्या पदाधिकार्‍यांनीही सहकार्य करावे, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. (प्रतिनिधी)