बनावट नोटांसह रिक्षाचालकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 01:01 AM2019-03-09T01:01:30+5:302019-03-09T01:01:32+5:30
बनावट नोटांसह रिक्षाचालकाला बुधवारी अटक करण्यात आली.
मुंबई : बनावट नोटांसह रिक्षाचालकाला बुधवारी अटक करण्यात आली. या नोटा त्याने व्यवहारात आणल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली असून, त्यानुसार पोलीस त्याची चौकशी करीत आहेत.
जयेश खैरे (३७) असे अटक रिक्षाचालकाचे नाव आहे. तो बोरीवलीचा राहणारा आहे. बनावट नोटा घेऊन काही लोक चारकोप परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ११ ला मिळाली. त्यानुसार या कक्षाचे प्रमुख चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शरद झिने आणि पथकाने घटनास्थळी सापळा रचला. खैरे त्या ठिकाणी आला. झिने यांनी त्याला ताब्यात घेत, चौकशी सुरू केली. सुरुवातीला तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होता. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली, तेव्हा त्याच्याकडे जवळपास २८ हजार ८५० रुपयांचे बनावट चलन सापडले. त्यात पाचशे, हजार आणि दोन हजार रुपयांच्या नोटा होत्या. या नोटा त्याने बाजारात वापरल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याला स्थानिक न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या नोटा त्याने कुठून आणल्या याबाबत सध्या चौकशी सुरू आहे.