Join us

वाहतूक पोलिसाची बाईक चोरणारा रिक्षा चालक गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 10:05 AM

मुंबई वाहतूक शाखेतील एका कॉन्स्टेबलची दुचाकी, वॉकी टॉकी संच आणि ई चलन मशिन गुरुवारी (27 सप्टेंबर) वांद्रे येथून चोरीला गेली.

मुंबई - मुंबई वाहतूक शाखेतील एका कॉन्स्टेबलची दुचाकी, वॉकी टॉकी संच आणि ई चलन मशिन गुरुवारी (27 सप्टेंबर) वांद्रे येथून चोरीला गेली. वॉकी टॉकीवर महत्त्वपूर्ण आणि गोपनीय संदेश पाठवले जात असल्याने सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. पोलिसांनी ४८ तासांत ही दुचाकी चोरणाऱ्या रिक्षा चालकाला अटक केली. 

वांद्रे वाहतूक चौकीतील पोलिस कॉन्स्टेबल संदीप महामुनी हे गुरुवारी रंगशारदा जंक्शन येथे नेमणुकीला होते. दुपारी जेवण्यासाठी ते वाहतूक चौकीजवळ आले. टॉविंग केलेल्या बऱ्याच गाड्या असल्याने त्यांनी चौकीपासून काही अंतरावर दुचाकी पार्क केली. आपल्याकडील वॉकी टॉकी संच आणि ई चलन मशिन त्यांनी दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवली. जेवण करून पुन्हा ड्युटीवर निघाले त्यावेळी दुचाकी त्या जागेवर नव्हती. आजूबाजूला विचारले पण कुणालाच काही माहीत नसल्याने अखेर त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार केली. 

वाहतूक चौकीपासून आजूबाजूच्या परीसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या फुटेजमध्ये एक इसम ही दुचाकी घेऊन जात असल्याचे दिसत होते. पोलिसांनी हे फुटेज वांद्रे परिसरातील खबरींना दाखविले. त्यावेळी हा रिक्षाचालक असल्याचे समजले. पोलिसांनी वांद्रे येथून बरकत अली शेख या रिक्षा चालकाला अटक केली. महामुनी यांनी अनेकदा वाहतुकीचे नियम मोडल्याने कारवाई केल्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचे शेख याने सांगितले.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई