मुंबई: निष्काळजीपणे रिक्षा चालवणे चालकाच्या जीवावर बेतले. हा प्रकार मार्च महिन्यात कांदिवली परिसरात घडला होता. ज्याच्या चौकशीअंती चालक ज्ञानेश्वर सुखदेवे (६२) यांच्या विरोधात कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखदेवे हे २५ मार्चला रंगपंचमी दिवशी रिक्षा घेऊन धंदा करायसाठी बाहेर पडले. त्यानंतर त्यांचा मित्र राजू यांनी फोन करत मुलगा प्रफुल्ल (३७) याला वडिलांचा अपघात झाल्याचे कळवले. प्रफुलने घटनास्थळी धाव घेतल्यावर कांदिवलीच्या एम जी रोड परिसरात असलेल्या एका पान टपरीजवळ सुखदेव यांचा अपघात झाल्याने त्यांच्या डोक्याला मार लागून ते बेशुद्ध पडलेले सापडले. तसेच रिक्षाही अपघातग्रस्त झाल्याचे त्याचीही काच फुटून नुकसान झाले होते. प्रफुल यांनी वडीलांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेले. तिथे त्यांना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनंतर सुखदेवे हे स्वतः गाडी चालवत असताना त्यांचे त्यावरील नियंत्रण सुटून रिक्षाचा अपघात झाला असे तपासात उघड झाले. त्यामुळे त्यांना कोणत्याही अनोळखी वाहनाने धडक दिली नसल्याचेही सिद्ध झाले. त्यानुसार पोलिसांनी मयत सुखदेवे यांच्याच विरोधात संबंधित कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला.