मुंबई : पार्किंगच्या किरकोळ वादात एका रिक्षाचालकाची हत्या झाल्याची घटना बोरीवली येथे शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून तेदेखील व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. शफीक खान उर्फ बबलू (३०) असे मयत चालकाचे नाव आहे. त्याच्यावर कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र त्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. बुधवारी हा प्रकार घडल्यानंतर त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करणारे प्रकाश उर्फ पक्या शिंदे (३०) आणि सुनील भोसले (३२) हे फरार झाले होते. बोरीवली पोलिसांना हल्लेखोरांची ओळख पटल्यानंतर ते त्या दोघांच्या मागावर होते. हे दोघे उस्मानाबादला पसार झाल्याची ‘टीप’ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बोरीवली पोलिसांचे पथक त्यांच्या शोधार्थ उस्मानाबादला रवाना झाले. त्या ठिकाणी या दोघांच्याही मुसक्या आवळत त्यांना मुंबईत आणण्यात आले.गेल्या शुक्रवारी गोराईच्या सायली महाविद्यालयाजवळ बोरीवली रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी असलेल्या रिक्षास्टॅण्डवर खान रिक्षा घेऊन प्रवाशांची वाट बघत रांगेत उभे होते. मात्र तितक्यात भोसले तिथे आला आणि त्याने रांग तोडत खानच्या गाडीपुढे स्वत:ची गाडी उभी केली. यावरून त्यांच्यात वाजले. तेव्हा शिंदे त्या ठिकाणी आला आणि त्याने खानला रिक्षास्टॅण्डपासून काही अंतरावर नेले. त्या ठिकाणी भोसलेने रॉडने खानवर हल्ला चढवला. खानला वाचविण्याचा प्रयत्न दयाशंकर यादव नामक चालकाने केला आणि खान घटनास्थळाहून पसार झाला. मात्र खानचा पाठलाग करत त्याला बेदम मारहाण भोसले आणि शिंदे यांनी केली. त्यात अखेर रुग्णालयात उपचारादरम्यान खानचा मृत्यू झाला.
रिक्षाचालकाची पार्किंगच्या वादातून हत्या; बोरीवलीत दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 4:00 AM