महिला रिक्षाचालकांचा आरटीओवर हल्लाबोल
By admin | Published: April 22, 2016 02:13 AM2016-04-22T02:13:50+5:302016-04-22T02:13:50+5:30
महिलांच्या रिक्षांना प्रस्तावित करण्यात आलेल्या वेगळ्या रंगाच्या सक्तीला महिला रिक्षा चालकांनी विरोध दर्शविला आहे.
नवी मुंबई : महिलांच्या रिक्षांना प्रस्तावित करण्यात आलेल्या वेगळ्या रंगाच्या सक्तीला महिला रिक्षा चालकांनी विरोध दर्शविला आहे. नवी मुंबईतील महिला रिक्षाचालकांनी यासंदर्भात आरटीओ कार्यालयावर हल्लाबोल करीत आपला निषेध नोंदविला. रिक्षांना वेगळा रंग करणे हे महिलांवर अन्याय असून हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी संतप्त महिला रिक्षाचालकांनी आरटीओ अधिकाऱ्यांकडे केली.
पुरुषांच्या एक पाऊल पुढे जात महिलाही रिक्षा चालविण्याच्या व्यवसायात उतरल्या आहे. इतकेच नव्हे, तर रिक्षा परवाना वाटपात शासनानेही महिलांना पाच टक्के आरक्षण सुरू केले आहे. याचा फायदा घेत अनेक महिला रिक्षा चालविण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. नवी मुंबई विभागात सध्या ६५ महिला रिक्षा चालक आहेत. शहराच्या विविध भागात या महिला रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. असे असले तरी राज्य शासनाने अलीकडेच महिलांच्या रिक्षांसाठी वेगळा रंग लावण्याचे सूतोवाच केले आहे. या पार्श्वभूमीवर आरटीओने महिलांच्या रिक्षांची नोंदणी थांबविली आहे. याचा महिला रिक्षा चालकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. अनेक महिलांनी परवाना प्राप्त झाल्यानंतर विविध बँका व वित्त संस्थांकडून कर्ज घेवून रिक्षा खरेदी केल्या आहेत. परंतु आता रंगसक्तीच्या नावावर आरटीओने त्यांची नोंदणीच थांबविल्याने कर्जाचे हप्ते फेडायचे कसे, असा सवाल या महिलांना पडला आहे. त्यामुळे शहरातील सर्व महिला रिक्षाचालकांनी रिक्षा महासंघाच्या माध्यमातून आरटीओ अधिकारी संजय धायगुडे यांची भेट घेवून आपली कैफियत मांडली. रिक्षांच्या वेगळ्या रंगामुळे महिलांना अडचण निर्माण होवू शकते. समाजकंटकांकडून त्यांना लक्ष्य केले जावू शकते. आजारपण किंवा इतर कारणांमुळे महिलांना काही दिवस रिक्षा चालविता आले नाही तर ती रिक्षा घरासमोर उभी ठेवण्यापलिकडे दुसरा पर्याय नसणार आहे. त्यामुळे कर्जाचे हप्ते वाढून महिलांना नवीन संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर महिलांच्या रिक्षांवर प्रस्तावित करण्यात आलेली रंगसक्ती रद्द करावी तसेच यासंदर्भातील शासनाचे धोरण निश्चित होईपर्यंत रिक्षा नोंदणी सुरू करावी, आदी मागण्या महिला रिक्षाचालकांनी आरटीओ अधिकारी धायगुडे यांच्याकडे केल्या. यावेळी रिक्षा महासंघाचे अध्यक्ष कासम मुलाणी, महिला नेत्या रिना सॅम्युअल, सुनील बोर्डे, सोमनाथ तळेकर आदींसह महिला रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)