मनोहर कुंभेजकर
मुंबई : जर मनात इच्छा व प्रबळशक्ति असेल तर कोणतीही गोष्ट कठीण नाही. एकीकडे रिक्षा ड्रायव्हर वडील दिवस रात्र मेहनत करून कुटुंबाचा गाढा चालवत असतांना मोलमजुरी,भांडी घासून किशोरवयात शिक्षण करणारी,आणि नंतर कॉल सेंटर मध्ये मान्या सिंह हिने काम केले. अनेक रात्रीं ती उपाशीपोटी झोपत असे. तर हातात पैसे नसल्याने बस किंवा रिक्षाने प्रवास न करता ती पायपीट करायची.
कांदिवली (पूर्व ) ठाकूर व्हिलेज मध्ये राहणारी 19 वर्षीय मान्या ओमप्रकाश सिंह हिने फेमिना मिस इंडिया उपविजेती हा बहुमान मिळवला आहे. सर्वंस्तरावर तिचे स्वागत होत आहे. वडिलांच्या रिक्षातून तिची नुकतीच ठाकूर व्हिलेज मध्ये मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी आईने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी केलेली मोलमजुरी आणि वडीलांचे कष्ट या आठवणींना उजाळ देत तिने वडिलांना मिठी मारली. यावेळी डोळ्यात अश्रू आलेल्या भावूक मान्याचा हा क्षण अनेकांनी त्यांच्या मोबाईल मधून टिपला आणि तिचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
उत्तर मुंबईचेे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी त्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ आणि शाल देऊन भेट देऊन नुकताच तिचा सन्मान केला. मान्या सिंह हिच्या घवघवीत यशाबद्धल तींने देशात उत्तर मुंबईचा गौरव केला ही अभिमानाची बाब असून मान्या सिंह हिने रक्त ,घाम गाळून प्रबळ इच्छाशक्तिच्या जोरावर हा बहुमान मिळवला असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी उत्तर भाजपा मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर , जिल्हा सरचिटणीस सत्यप्रकाश (बाबा) सिंह ,दिलीप पंडित, स्थानिक नगरसेवक प्रीतम पंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.