Join us

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा! सीसीटीव्हीतील रिक्षा नंबरमुळे सापडला लग्नातील लाखोंचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 12:15 PM

नायगावच्या सिटीजन अपार्टमेंटमध्ये राहणारे मधुकर येरम (६३) यांच्या मुलाचे १६ नोव्हेंबरला काशिमिरा येथे लग्न होते.

नालासोपारा : मुलाचे लग्न झाल्यावर मिळणारा सोन्याचा आहेर सांभाळून ठेवला जातो, पैशाचा आहेर मोजला जातो पण आहेराची बॅगच लग्नाच्या दिवशी रिक्षात विसरली गेली आणि दिवसभर तपास करून पण ती मिळाली नाही, तर किती मानसिक तणाव येतो, हे नायगाव येथील मधुकर येरम यांनी अनुभवले. परंतु केवळ सीसीटीव्हीत रिक्षाच्या मिळालेल्या नंबरच्या आधारे वालीव पोलिसांनी उत्कृष्ट तपास करून आणि ज्या रिक्षातून प्रवास केला त्या रिक्षाचालकाने दाखवलेला प्रामाणिकपणा यामुळे येरम यांना तीन दिवसाने का असेना ती बॅग सर्व वस्तूंसह परत मिळाली. प्रामाणिक रिक्षाचालक रामकैलास यादव यांचाही पोलिसांनी सत्कार केला.   

नायगावच्या सिटीजन अपार्टमेंटमध्ये राहणारे मधुकर येरम (६३) यांच्या मुलाचे १६ नोव्हेंबरला काशिमिरा येथे लग्न होते. लग्न आटोपून ते संध्याकाळी लग्नामध्ये मिळालेली ६० पाकिटे त्यात ६० हजार रुपये, एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, दीड तोळ्याचे सोन्याचे कानातले, एक मुरणी, साडेबारा हजारांची रोख रक्कम, दोन चांदीचे शिक्के आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे एका निळ्या बॅगेत व इतर सामान घेऊन रिक्षाने घरी परतत होते. नायगावला येरम हे इतर सामान घेऊन उतरले, पण मागे ठेवलेली आहेर, पैसे आणि इतर वस्तू असलेली बॅग घेण्यास विसरले. 

चिंचोटी येथे राहणारे रिक्षाचालक यादव हे नंतर घरी गेल्यावर त्यांचा ७ वर्षांचा मुलगा सनी हा त्यांच्याकडे पळत आला व रिक्षात बसला. त्याने ही बॅग कोणाची आहे? असे विचारल्यावर त्यांच्या लक्षात आले. बॅग उघडली, तर त्यामध्ये मौल्यवान वस्तू आणि आधारकार्ड पाहिले. रिक्षाचालक रामकैलास हे मित्राला घेऊन मधुकर येरम यांच्या आधारकार्डवर असलेल्या नालासोपारा येथील पत्त्यावर पोहोचले, परंतु संबंधित नावाची कोणीही व्यक्ती तिथे राहत नसून ते कुठे राहतात हे तेथील परिसरातील कोणालाच माहीत नव्हते, त्यामुळे ते बॅग घेऊन पुन्हा घरी परतले. रिक्षाचालक रामकैलास हे बॅग विसरून गेलेल्या दाम्पत्याला शोधण्याचा तीन दिवस प्रामाणिक प्रयत्न करत होते. 

येरम यांनी रिक्षामध्ये बॅग विसरल्याबाबत वालीव पोलीस ठाण्यात तक्रार केली. गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस नाईक सचिन दोरकर यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून रिक्षाचा ३०४९ हा नंबर मिळवला. नंतर दोरकर यांनी सर्व आरटीओ कार्यालय यांच्याशी पत्रव्यवहार केला. सारख्या नंबरच्या २१ रिक्षांचे नंबर मिळाल्यावर ऑटोचालक युनियनसोबत दोरकर यांनी संपर्क करून तपास सुरू केला. त्याचबरोबर विरार वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाराम करांडे यांना घडलेली घटना सांगितली. यांनी त्यांचे ई-चलन सिस्टिमद्वारे तांत्रिक तपास सुरू केला. त्यावरून एक रिक्षा मिळाली. रिक्षाचालकाला संपर्क केल्यावर रामकैलास यांनी मी गेल्या तीन दिवसांपासून त्रस्त असून त्या बॅगमालकाचा शोध घेत होतो, असे सांगून थोड्याच वेळात बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली. नंतर येरम यांना ती बॅग सुपूर्द केली. यावेळी रामकैलास यांच्या चेहऱ्यावर अधिक आनंद दिसत होता. 

टॅग्स :मुंबई