रिक्षाला ओव्हरटेक करणे जीवावर बेतले, मोटारसायकल अपघातात दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 04:53 AM2019-02-05T04:53:06+5:302019-02-05T04:53:16+5:30
भरधाव वेगात दुचाकी चालवत रिक्षाला ओव्हरटेक करणे, दोन मित्रांच्या जीवावर बेतले. रविवारी संध्याकाळी हा अपघात कांदिवली पूर्व परिसरात घडला असून समतानगर पोलीस या प्रकरणी चौकशी करीत आहेत.
- गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई - भरधाव वेगात दुचाकी चालवत रिक्षाला ओव्हरटेक करणे, दोन मित्रांच्या जीवावर बेतले. रविवारी संध्याकाळी हा अपघात कांदिवली पूर्व परिसरात घडला असून समतानगर पोलीस या प्रकरणी चौकशी करीत आहेत. दीपक शेखर शेट्टी (२२) आणि लोकेश छगनलाल बाभालिया (२७) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. यात शेट्टी हा मालवणी तर बाभलिया हा सांताक्रुझचा राहणारा आहे.
रविवारी सुट्टी असल्याने दुुचाकीवरून फेरफटका मारण्यास ते कांदिवलीतील लोखंडवाला संकुलाच्या दिशेने निघाले होते. साईधाम परिसरात एक रिक्षाला भरधाव वेगात ओव्हरटेक करताना त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि दुचाकी रस्ता दुभकावर आदळली. त्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. तर रिक्षाही पलटल्याने त्यातील प्रवासी जखमी झाले. समतानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वाघमारे, साहाय्यक पोलीस निरीक्षक मैत्रे, साहाय्यक पोलीस निरीक्षक आंधळे आणि सचिन धोबी हे कर्तव्य बजावून घराच्या दिशेने निघाले होते. तेव्हा त्यांनी हा अपघात पाहिला आणि जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करविले. मात्र उपचारापूर्वीच दोन्ही दुचाकीस्वारांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्याजवळ असलेल्या बॅगमध्ये दोन मोबाइल सापडले. त्याच्या मदतीने पोलिसांनी दोघांच्याही घरच्यांना अपघाताची माहिती दिली.
...तर ते वाचले असते
बाभालिया आणि शेट्टी यांचा अपघात झाल्यावर रक्ताच्या थारोळ्यात ते मदतीसाठी विव्हळत होते. मात्र त्या ठिकाणी जमा झालेल्या रिक्षा आणि अन्य वाहनचालकांनी निव्वळ बघ्याची भूमिका घेतली. त्यांनी जर थोडी माणुसकी दाखवत दोघांना रुग्णालयात हलविले असते तर कदाचित वेळेत उपचार मिळाल्याने ते वाचले असते, अशी खंत एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केली.