Join us

मराठी भाषेतील अनुत्तीर्ण उमेदवारांनाही रिक्षा परवाना

By admin | Published: April 21, 2017 3:53 AM

गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात आॅनलाइन आॅटोरिक्षा परवाना सोडतीतील यशस्वी उमेदवारांसाठी मराठी भाषेची चाचणी

मुंबई : गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात आॅनलाइन आॅटोरिक्षा परवाना सोडतीतील यशस्वी उमेदवारांसाठी मराठी भाषेची चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत ८,०६८ उमेदवार अपात्र ठरले होते. मात्र, अर्ज अपात्र करू नयेत असे निर्देश नुकतेच उच्च न्यायालयाने दिल्याने अपात्र उमेदवारांना दिलासा मिळाला असून, न्यायालयाच्या आदेशानंतर परिवहन आयुक्त कार्यालयाकडून १९ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यास उमेदवारांना सांगण्यात आले आहे. ४१ हजार ५८९ आॅटोरिक्षा परवान्यांचे लॉटरी पद्धतीने वाटप १२ जानेवारी रोजी करण्यात आले. यातील यशस्वी उमेदवारांची मराठी भाषेच्या ज्ञानाची परीक्षा घेण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला. त्यानुसार राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र व पुणे यासह पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नागपूर, नाशिक व औरंगाबाद महापालिका क्षेत्रात २९ फेब्रुवारी ते ५ मार्चपर्यंत परीक्षा घेण्यात आली. तर ही परीक्षा घेताना ज्या उमेदवारांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नाही, अशा उर्वरित उमेदवारांची परीक्षा ७ मार्च रोजी घेण्यात आली. या परीक्षेसाठी एक मराठी भाषेतील परिच्छेत उमेदवारांना वाचण्यासाठी देण्यात आला. यात जवळपास ८ हजार ६८ उमेदवार अपात्र ठरले होते. मराठी भाषेची चाचणी घेण्याच्या निर्णयाविरोधात काही रिक्षा संघटनांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर अपात्र अर्जदारांचे अर्ज अपात्र करू नयेत, असे निर्देश न्यायालयाने दिले. त्यानुसार परिवहन आयुक्त कार्यालयाकडून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. मराठी भाषा चाचणीत अपात्र ठरलेल्या उमेदवारांना आवश्यक त्या कागदपत्रांची तपासणी करून रिक्षा परवाने जारी करण्यात येणार आहेत. त्यासाठी संबंधित आरटीओच्या कार्यालयात उपस्थित राहून कागदपत्र सादर करावेत, असे आवाहन परिवहन आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)