Join us

खराब रस्त्यांमुळे झालेल्या अपघातात रिक्षाचालकाला दोष देऊ शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:10 AM

न्यायालयाने रिक्षा चालकाची केली सुटकाखराब रस्त्यांमुळे झालेल्या अपघातात रिक्षाचालकाला दोष देऊ शकत नाहीज्येष्ठ नागरिक प्रवाशाचे मृत्यू प्रकरण ...

न्यायालयाने रिक्षा चालकाची केली सुटका

खराब रस्त्यांमुळे झालेल्या अपघातात रिक्षाचालकाला दोष देऊ शकत नाही

ज्येष्ठ नागरिक प्रवाशाचे मृत्यू प्रकरण : न्यायालयाने रिक्षाचालकाची केली सुटका

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शहरातील खराब रस्त्यांमुळे वाहनचालकांची चूक नसतानाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने एका रिक्षाचालकाला ११ वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिक प्रवाशाच्या मृत्यूस जबाबदार असल्याच्या आरोपातून सुटका केली.

रिक्षाचालक ज्या रस्त्यावरून रिक्षा चालवत होता, तो रस्ता खराब होता. खराब रस्त्यामुळे चालक रिक्षा नीट चालवू शकला नाही. खराब रस्त्यांमुळे वाहन चालकाची चूक नसतानाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

पीडित नसीन बगदादीची मुलगी स्नेहल देसाई आणि त्यांचे दोन नातू यांना या अपघातात केवळ दुखापत झाली. तर रिक्षाचालक सूरज कुमार जयस्वाल (३१) याला निष्काळजीपणे गाडी चालवून प्रवाशाच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.

बगदादीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, ७ जून २०१० रोजी ते सगळे रिक्षेने मीरा रोडला जात होते. आरोपी बेदरकारपणे रिक्षा चालवत होता. आरे कॉलनीजवळ आरोपीचे रिक्षावरचे नियंत्रण सुटले आणि रिक्षा सिमेंटच्या पोलवर आदळली. त्या अपघातात बगदादीला गंभीर दुखापत झाली. तिच्या छातीला मार बसला. पोटातही गंभीर दुखापत झाली. तसेच तिच्या मुलीला व नातवंडांनाही दुखापत झाली. आजूबाजूने जाणाऱ्या लोकांनी या सर्वांना रुग्णालयात दाखल केले.

बगदादीला रुग्णालयात नेल्यानंतर पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिचा मृत्यू झाला.

आधी रिक्षाचालकावर बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे गाडी चालविल्याबाबत गुन्हा नोंदविला. मात्र, बगदादीच्या मृत्यूनंतर चालकावर दुर्लक्षपणामुळे मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप करत गुन्हा नोंदविण्यात आला.

स्नेहल आणि तपास अधिकाऱ्याने न्यायालयात साक्ष नोंदविली. स्नेहलने न्यायालयाला सांगितले की, रिक्षाचालक गाडी नीट चालवत नव्हता. रिक्षा उलटल्यावर आईला गंभीर दुखापत झाली आणि ते पाहून रिक्षाचालक फरार झाला.

काय म्हणाले न्यायालय?

दोन्ही साक्षीदारांनी रस्ता खराब असल्याचे मान्य केले आहे. तसेच खुद्द स्नेहल यांनी रिक्षाचालक वेगाने रिक्षा चालवत होता, असे म्हटले नाही. अशा स्थितीत रिक्षाचालक बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे गाडी चालवत होता, या सरकारी वकिलांचा आरोपावर शंका येते, असे न्यायालयाने म्हटले.