अंबरनाथ : कोन गावानंतर थेट अंबरनाथमध्ये सीएनजी पंप असल्याने कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरातील बहुसंख्य रिक्षाचालक त्यावर येतात. मात्र गॅस भरण्यासाठी मोठी रांग लागत असल्याने काही रिक्षाचालक पंपावरील कामगाराला जादा पैसे देऊन रांग न लावता गॅस भरत आहेत. हा प्रकार नियमित झाल्याने येथील रिक्षाचालकांनी शनिवारी पंपावर गोंधळ घातला. ही बाब स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंप मालकाला ताकीद दिली. फॉरेस्ट नाक्यावर हा पंप आहे. मात्र दिवसाला त्यावर १२ ते १५ हजार रिक्षाचालक सीएनजी भरण्यासाठी येतात. मोठी रांग येथे लागत असल्याने तो आता दिवसरात्र सुरु ठेवण्यात आला आहे. असे असले तरी गॅस भरण्यासाठी तीन ते चार तास लागत असल्याने काही रिक्षा चालक गॅस स्टेशनवरील कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन रिक्षा रांगेत न ठेवता जादा पैसे देऊन लगेच गॅस भरत आहेत. हा प्रकार इतर रिक्षा चालकांना कळतात त्यांनी या प्रकरणी पंप मालकाकडे तक्रार केली. मात्र त्यानंतरही हा प्रकार बंद न झाल्याने त्यांनी आमदार किणीकर यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केल्याने यांनी स्वत: शनिवारी या पंपावर धाड टाकली असता त्यांच्याही ही बाब लक्षात आली. अखेर पंप चालकाला या प्रकरणी ताकीद देण्यात आली. तसेच तेथील कर्मचाऱ्यांनाही यापुढे चुकीचे काम न करण्याची समज दिली. (प्रतिनिधी)
सीएनजीसाठी रिक्षाचालकांचा गोंधळ
By admin | Published: June 27, 2015 11:24 PM