Join us

रिक्षाचालकांचे कधी राईट, तर कधी लेफ्ट; पळवापळवीने प्रवाशांचा वैताग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 4:07 AM

मुंबई : कोरोनाच्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर मुंबई हळूहळू पूर्वपदावर येत आहे. असे असले तरी मुंबईतील रिक्षाचालकांचा मनमानी कारभार ...

मुंबई : कोरोनाच्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर मुंबई हळूहळू पूर्वपदावर येत आहे. असे असले तरी मुंबईतील रिक्षाचालकांचा मनमानी कारभार काही थांबला नसल्याचे दिसून येत आहे. शहरात वाहतुकीचे नियम न पाळणे, प्रवाशांची पळवापळवी करणे, मनमानी भाडे आकारणी, प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचविण्यास नकार या कारणांमुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा रिक्षाचालकांबद्दल रोष दिसून येत आहे.

या ठिकाणी रिक्षाचालकांची मनमानी

लोकमान्य टिळक टर्मिनस -

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर अनेकदा रिक्षाचालकांचा मनमानी कारभार दिसून येतो. येथे दररोज लांब पल्ल्याच्या गाड्या मोठ्या प्रमाणात येतात. अशावेळी परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची रिक्षाचालकांकडून अनेकदा लूट होते. मनमानी भाडे आकारणे, प्रवाशांशी गैरवर्तन यासारख्या घटना येथे घडतात.

मैत्रीपार्क एसटी थांबा -

या ठिकाणी मुंबईच्या पूर्व उपनगरात जाण्यासाठी प्रवासी एसटी बसमधून उतरतात व रिक्षाने घाटकोपर, मुलुंड या ठिकाणी जातात. अनेकदा प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडे न आकारता भाड्याचा दर आधीच ठरविला जातो. या थांब्यावर रिक्षाचालकांचे जुगाराचे डावदेखील रंगतात. प्रवाशांची गैरसोय होते.

मनमानी भाडे

रिक्षाचे मुंबईत किमान भाडे २१ रुपये असून रात्रीच्या वेळेस हे भाडे २७ रुपये आहे. प्रवाशांना रिक्षाने प्रवास करायचा असल्यास त्यांच्याकडून मीटरप्रमाणे भाडे आकारणे बंधनकारक आहे. मात्र अनेकदा रिक्षाचालक प्रवाशी रिक्षात बसण्याआधीच मनमानी भाडे सांगतात. यामुळे सामान्य माणसांची लूट होते.

प्रवाशांना त्रास

उदय काकडे (प्रवासी) - रिक्षाचालकांची भाडे नाकारण्याची सवय काही केल्या जात नाही. अनेक रिक्षांच्या मीटरमध्येदेखील फेरफार केलेली असते. प्रत्येक रिक्षाच्या मीटरमध्ये वेगवेगळे भाडे दाखविले जाते. अशा रिक्षाचालकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

प्राजक्ता तोडणकर (प्रवासी) - मुंबईत कुर्ला, सायन, वांद्रे, बोरीवली या ठिकाणी काही रिक्षाचालक शिस्तीचे पालन करीत नाहीत. कित्येक रिक्षाचालकांच्या अंगावर त्यांचा युनिफॉर्मदेखील नसतो. अशा वेळी रिक्षातून प्रवास करणे असुरक्षिततेचे वाटते.

नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाची करडी नजर असते. रिक्षा चालकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवर रिक्षांसाठी विशिष्ट नियम तयार करण्यात आले आहेत. तेथे बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असतो.