Join us

रिक्षातील प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कामानिमित्त पहाटेच्या वेळी रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणाऱ्या मोहम्मद हयात सय्यद (३०, रा. मुंब्रा), ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कामानिमित्त पहाटेच्या वेळी रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणाऱ्या मोहम्मद हयात सय्यद (३०, रा. मुंब्रा), मुस्तफा पावसकर (३७, रा. श्रीलंका, मुंब्रा) आणि मुज्जमील उर्फ गुड्डू उर्फ हॉरर शेख (२४, रा. मुंब्रा) या तिघा जणांच्या टोळीला डायघर पोलिसांनी अटक केल्याची माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी सोमवारी दिली. त्यांच्याकडून जबरी चोरीतील लॅपटॉपसह ६५ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

डायघर गावातील रहिवासी योगेश लोहार हे २२ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास कल्याणफाटा येथून कळंबोली बसथांबा येथे जात होते. ते दहिसर मोरी येथे आल्यावर रिक्षात बसलेल्या अन्य दोन प्रवाशांनी रिक्षाचालकाशी संगनमताने योगेश यांना मारहाण केली. नंतर त्यांच्याकडील लॅपटॉप, पॉवर बँक आणि रोकड असा २८ हजारांचा मुद्देमाल हिसकावून पसार झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे आणि भूषण कापडणीस यांच्या पथकाने सापळा लावून मोहम्मद सय्यद याच्यासह तिघांना ४ फेब्रुवारी रोजी अटक केली. सखोल चौकशीमध्ये त्यांनी या जबरी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून लॅपटॉप, पॉवर बँक, आधार कार्ड आणि जबरी चोरीसाठी वापरलेली रिक्षा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिघांनाही ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

आरोपींविरुद्ध नांदेडमध्येही गुन्हा दाखल

तिन्ही आरोपी चोरी आणि जबरी टोळीतील सराईत गुन्हेगार असून यातील मोहम्मद सय्यद याच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात पाच, तर नांदेड येथील लकडगंज पोलीस ठाण्यात दरोड्याचा एक असे सहा गुन्हे नोंद आहेत. पावसकर याच्याविरुद्ध मुंबई, ठाण्यात चोरीचे सहा गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून अन्यही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.