रिक्षा संपामुळे मुंबईकरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2016 05:51 AM2016-09-01T05:51:49+5:302016-09-01T05:51:49+5:30

ओला, उबर यासह अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांवर निर्बंध आणावे, अवैध वाहतुकीवर बंदी आणावी, यासह अन्य मागण्यांसाठी मुंबई आॅटोरिक्षा व टॅक्सीमेन्स युनियनकडून बुधवारी एक दिवसाचा रिक्षा संप पुकारण्यात आला होता

Rickshaw strike | रिक्षा संपामुळे मुंबईकरांचे हाल

रिक्षा संपामुळे मुंबईकरांचे हाल

Next

मुंबई : ओला, उबर यासह अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांवर निर्बंध आणावे, अवैध वाहतुकीवर बंदी आणावी, यासह अन्य मागण्यांसाठी मुंबई आॅटोरिक्षा व टॅक्सीमेन्स युनियनकडून बुधवारी एक दिवसाचा रिक्षा संप पुकारण्यात आला होता. या संपात मोठ्या प्रमाणात रिक्षाचालक सामील झाल्याने मुंबईकरांचे बरेच हाल झाले. पूर्व व पश्चिम उपनगरातील अनेक ठिकाणी रिक्षा बंद असल्याने मुंबईकरांना पायपीट करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. संपाला तोंड देण्यासाठी बेस्टकडून जादा बस सोडण्यात आल्याने थोडाफार दिलासा मुंबईकरांना मिळाला.
आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबई आॅटोरिक्षा व टॅक्सीमेन्स युनियनकडून एकदिवसीय संपाची हाक देण्यात आली होती. रिक्षा बंद ठेवण्याचा निर्धारच युनियनकडून करण्यात आल्याने, मुंबई उपनगरात जवळपास ९0 टक्के रिक्षा बंद ठेवण्यात आल्या. काही शेअर रिक्षा आणि स्वाभिमानसह अन्य रिक्षा संघटना संपात सहभागी न झाल्याने संपावर थोडा-फार परिणाम झाला. सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना रेल्वे स्थानक आणि कार्यालयांपर्यंत जाण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागली. महत्त्वाची बाब म्हणजे, वृद्ध आणि विद्यार्थ्यांचे यात हाल झाले. संप यशस्वी करण्यासाठी युनियनचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून लक्ष घालत होते. काही ठिकाणी रिक्षा धावत असल्याचे दिसताच, युनियनचे कार्यकर्ते त्यांना बंद असल्याची माहिती देत होते. रिक्षा मिळत नसल्याने बस स्थानकांवर प्रचंड गर्दी होती. सायन, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, विलेपार्ले, सांताक्रुझ, खार, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवलीसह अन्य काही भागांत रिक्षा बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.
मुंबई आॅटोरिक्षा व टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले की, मागण्यांसंदर्भात परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासोबत बुधवारी बैठक झाली. या बैठकीत अवैध वाहतुकीला आळा बसवण्यासाठी पथक नेमण्याची मागणी केली. त्याला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे, ओला, उबरवर निर्बंध आणण्यासाठी केंद्र सरकारच्या एका समितीसमोर हा मुद्दा मांडण्यात येणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले, तसेच परिवहनमंत्र्यांसोबतही बैठक होणार आहे. ओला, उबर यासह खासगी कंपन्यांवर निर्बंध आणावेत, या मुख्य मागणीसाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि मुंबई आॅटोरिक्षा व टॅक्सीमेन्स युनियन, जय भगवान महासंघ, तसेच स्वाभिमान टॅक्सी युनियन यांच्यात १ सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. (प्रतिनिधी)


संपात बेस्टचा दिलासा
मुंबई : मुंबईच्या उपनगरात बुधवारी रिक्षाचालकांनी पुकारलेल्या संपात प्रवाशांचे हाल होऊ नयेत, म्हणून बेस्टने १२३ जादा बसगाड्या चालवल्या होत्या. पूर्व आणि पश्चिम उपनगरातील विविध आगारांतून सोडण्यात आलेल्या या जादा बसगाड्यांनी रिक्षा संपात प्रवाशांना दिलासा देण्याचे काम केले.
ओला, उबरवर निर्बंध आणावे, अवैध वाहतुकीवर बंदी आणावी आणि तीन वर्षे झालेल्या लायसन्सधारक रिक्षा चालकांना बॅज देण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी मुंबई आॅटोरिक्षा व टॅक्सीमेन्स युनियनकडून बुधवारी एक दिवसीय संप पुकारण्यात आला होता.
बुधवारी सकाळपासूनच संपाचा फटका प्रवाशांना बसू लागला. कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी, गोरेगाव आणि बोरीवली येथे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.
परिणामी, वडाळा, वांद्रे, अणुशक्तीनगर, विक्रोळी, मुलुंड, देवनार, कुर्ला, मालाड, मजास, दिंडोशी, मागाठणे आणि ओशिवरा येथून या जादा बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या. दरम्यान, बेस्टकडून नियमित सुमारे तीन हजार सहाशे बस चालवण्यात येतात.
संघटनांनी संपाचा इशार दिल्यानंतर, बेस्टने जादा बसगाड्या सोडण्याची व्यवस्था केली होती. त्यानुसार, जेथून बसगाड्यांची अधिक मागणी होती. तेथील आगारांतून अधिक बसगाड्या सोडण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या जादा गाड्यांमुळे रिक्षासंपामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. (प्रतिनिधी)

Web Title: Rickshaw strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.