मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. रेड झोनमध्ये टॅक्सी बंद आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांचे कुटुंब त्यावर अवलंबून आहे. एकीकडे रिक्षा-टॅक्सी बंद आहे तर दुसरीकडे सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही. त्या टॅक्सी चालकांनी घर कसे चालवायचे, असा सवाल टॅक्सीचालक संघटनेने विचारला आहे.
रिक्षा-टॅक्सी मेन्स युनियनचे नेते ए.एल. क्वाड्रोस म्हणाले की, लॉकडानमध्ये रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दिल्ली सरकारने रिक्षा-टॅक्सी चालकांना पाच हजारांची मदत दिली आहे. पण मुंबईत कोणतीही मदत केली नाही. तर उलट रिक्षा-टॅक्सी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे रोजचा खर्च, त्यावर अवलंबून असणारे खाणार काय, असा प्रश्न आहे. तीन महिने गाडी बंद आहे त्यांनी घर कसे चालवायचे? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सुरक्षेची खबरदारी घेण्यास तयार आहोत, पण सरकारने परवानगी दिली पाहिजे. एकीकडे खासगी वाहनांना अत्यावश्यक सेवेसाठी सूट देण्यात आली आहे.
चारचाकी वाहनांना चालक आणि दोन प्रवासी तर दुचाकीला केवळ चालक अशी परवानगी आहे, पण रिक्षा-टॅक्सी पूर्णपणे बंद असणार आहे. आता विमानसेवा आणि रेल्वे सुरू करण्यात आली आहे. पण रिक्षा-टॅक्सी नसेल तर लोक तेथे पोहोचणार कसे, रुग्णालयात जाण्यासाठीही रिक्षा-टॅक्सीची आवश्यकता आहे. त्यामुळे सरकारने १ जूनपासून रिक्षा-टॅक्सी सुरू करावी, अशी मागणी क्वाड्रोस यांनी केली आहे.