Join us

रिक्षा-टॅक्सीचालकांमध्ये भाडेवाढीबाबत संभ्रम कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 1:37 AM

आरटीओच्या निर्णयानंतरही अद्याप नवे दरपत्रक चालकांच्या हाती नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईसह आसपासच्या परिसरात सोमवार, १ मार्चपासून रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात आली. प्रत्येकी भाडेवाढ ही ३ रुपयांची करण्यात आली आहे. मात्र, याबाबत दुसऱ्या दिवशीही रिक्षा-टॅक्सीचालकांमध्ये संभ्रम पाहायला मिळाला.सोमवार, १ मार्चपासून प्रवाशांना रिक्षाच्या प्रवासासाठी २१ रुपये आणि टॅक्सीच्या प्रवासासाठी २५ रुपये मोजावे लागणार आहेत; परंतु भाडेवाढीच्या दुसऱ्या दिवशी नवीन भाडेदरासाठी मीटरमध्ये बदल करण्यास दिलेली ३ महिन्यांची मुदत आणि अद्याप चालकांच्या हाती नवे दरपत्रकच मिळाले नाही. त्यामुळे रिक्षा-टॅक्सीचालकांमध्ये संभ्रम आहे.मागील ५ वर्षांत रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा दोन्ही सेवांसाठी किमान ३ रुपये भाडेवाढ करण्यात आली आहे. यामध्ये रिक्षाचे सुरुवातीचे दीड किलोमीटरचे भाडे १८ वरून २१ रुपये आणि टॅक्सीचे भाडे २२ वरून २५ रुपये करण्यात आले आहे, तर रात्रीच्या भाडेदरातही बदल झाले आहेत. नवीन भाडेदरासाठी चालकांना मीटर अद्ययावत करावे लागणार असून, त्यासाठी मे महिन्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत नवीन भाड्याची आकारणी दरपत्रकानुसार करण्यात येणार आहे. हे दरपत्रक चालकांना परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येईल किंवा रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून त्याची छापील प्रत मिळणार आहे. त्यावर परिवहनचा बारकोड आवश्यक आहे; परंतु मंगळवारीही अनेक चालकांकडे नव्या भाड्याचे दरपत्रकच नव्हते. त्यामुळे प्रवासी रिक्षात बसल्यानंतर जुन्या मीटरप्रमाणेच भाडे आकारणी होत होती.रिक्षा-टॅक्सी भाडेपत्रक देता येत नाहीउच्च न्यायालयाच्या २०१५च्या आदेशानुसार रिक्षा-टॅक्सी भाडेपत्रक देता येत नाही. परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर भाडेपत्रक उपलब्ध आहे. रिक्षा-टॅक्सीचालकांनी ते डाऊनलोड करायला हवे, असे मुंबई मेन्स टॅक्सी युनियनचे नेते ए.एल. क्वाड्रोक्स यांनी सांगितले.मीटर अद्ययावत केले नाहीत भाडेवाढपत्रक मिळाले नाही, भाडेवाढ झाल्याचे कुणीही सांगितले नाही. रिक्षाचे मीटर अद्ययावत केले नाहीत. त्यामुळे आम्ही जुनेच दर आकारत आहोत.-संतोष जाधव, रिक्षाचालक