रिक्षा, टॅक्सी भाडेवाढ सहीअभावी रखडली; २ आणि ३ रुपयांची होणार होती वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 07:17 AM2022-09-27T07:17:53+5:302022-09-27T07:18:27+5:30
सोमवारी रात्री उशिरापर्यंत भाडेवाढीवर दोन सह्या नसल्याने प्रस्तावित भाडेवाढ रखडली आहे.
मुंबई : राज्य सरकारने रिक्षा-टॅक्सी चालकांना भाडेवाढीची घोषणा केली होती. त्यात रिक्षा-टॅक्सी मीटरमध्ये अनुक्रमे २ व ३ रुपये भाडेवाढ होती. या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाची सोमवारी बैठक पार पडली. मात्र, सोमवारी रात्री उशिरापर्यंत भाडेवाढीवर दोन सह्या नसल्याने प्रस्तावित भाडेवाढ रखडली आहे.
रिक्षा-टॅक्सी संघटनांची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत शुक्रवारी बैठक झाली होती. त्यात भाडेवाढ जाहीर केल्यानंतर रिक्षा-टॅक्सी संप मागे घेण्यात आला. मात्र, भाडेवाढ देण्याचा अधिकार प्राधिकरणाला आहे. सोमवारी प्राधिकरणाची बैठक झाली. त्यात विविध वादग्रस्त मुद्दे असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सही करण्यास नकार दिल्याचे समजते. परिवहन अधिकाऱ्यांमध्ये एकमत होत नसल्याने सहीस विलंब होत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सीएनजी दरात सातत्याने वाढ होत आहे. शहरात बेस्ट स्वस्त वाहतूक आहे. ॲपबेस्ड टॅक्सी सेवाही सुरू आहेत, अशी आव्हाने असताना सरकारने केवळ भाडेवाढ मंजूर करून आपले हात झटकू नये. रिक्षा-टॅक्सी व्यवसाय टिकून राहण्यासाठी ४० टक्के अनुदानित दरात सीएनजी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी रिक्षा-टॅक्सी चालकांकडून सातत्याने करण्यात येत आहे.
भाडेवाढीच्या निर्णयावर तसेच बैठकीत झालेल्या विषयांच्या मुद्द्यांवर आणि निर्णयांवर दोन सह्या बाकी आहेत. त्या झाल्यावर भाडेवाढीची माहिती देण्यात येईल.
डॉ. अविनाश ढाकणे,
परिवहन आयुक्त