८ जूननंतरच भाडेवाढ?मुंबई : हकिम समितीच्या शिफारशीनुसार रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात १ जूनपासून एक रुपया वाढ करण्याचा निर्णय एमएमआरटीएने घेतला. रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ जाहीर झाली असली तरी याची प्रत उच्च न्यायालयात सादर करणे राज्य शासनाला बंधनकारक आहे. सध्या उन्हाळ्याची सुटी सुरू असल्याने ही प्रत तूर्तास तरी न्यायालयात सादर होणे शक्य नाही. त्यामुळे ८ जूनला उच्च न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतरच ही भाडेवाढ लागू होऊ शकते, असे आरटीओतील सूत्रांनी सांगितले.एमएमआरटीएने आता रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात प्रत्येकी एक रुपया वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रिक्षाचे भाडे १७ रुपयावरून १८, तर टॅक्सीचे भाडे २१ रुपयावरून २२ रुपये होणार आहे. १ जूनपासून ही भाडेवाढ करण्यात येणार असल्याचे एमएमआरटीएकडून यापूर्वीच सांगण्यात आले आहे. मात्र ही भाढेवाढ न्यायालयीन सुटीमुळे लांबणीवर गेली आहे. ११ मेपासून सुटी पडली असून, ती ७ जूनपर्यंत आहे. यासंदर्भात सरकारी वकिलांकडूनही आरटीओला एक पत्र देण्यात आले आहे. ८ जूनपासून न्यायालय सुरू होत असून तेव्हा किंवा त्यानंतरच या याचिकेवर सुनावणी होईल.