Join us

रिक्षा-टॅक्सी मीटर अद्ययावतीकरणास ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 6:14 AM

Rickshaw-taxi meter update : मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

मुंबई : कोरोना काळात रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ लागू केल्यानंतर नवे दर मीटरमध्ये दिसण्यासाठी आवश्यक असणारी मीटर अद्ययावतीकरण प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. कोरोना संसर्गाच्या संकटात रिक्षा-टॅक्सीचालकांना दिलासा देण्यासाठी अद्ययावतीकरणाला ३१ जानेवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या २२ फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत रिक्षा आणि टॅक्सीचालकांना भाडेवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच मीटर अद्ययावतीकरण करण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या निर्देशाप्रमाणे रिक्षा आणि टॅक्सी मीटरचे कामकाज  होऊ शकले नाही. त्यामुळे  रिक्षा-टॅक्सी मीटर अद्ययावतीकरणाची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्याची मागणी रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानुसार परिवहन विभागाने ही मुदतवाढ दिली आहे.

मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानुसार रिक्षाचे किमान भाडे २१ आणि टॅक्सीचे किमान भाडे २५ रुपये झाले आहे. मीटर कॅलिब्रेशन प्रक्रियेसाठी मीटर काढणे, सॉफ्टवेअर अपडेट करणे, आरटीओची मंजुरी घेणे अशी वेळखाऊ प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ७५०-१००० रुपयांपर्यंत खर्च येतो. लॉकडाऊन काळात उत्पन्नाअभावी या खर्चाचा अतिरिक्त भार चालकांना सहन करावा लागत आहे. 

अन्यथा निलंबन आणि दंडरिक्षा-टॅक्सी मीटर अद्ययावतीकरण मुदतीत न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी एक दिवस परवाना निलंबन, मात्र किमान ७ तर जास्तीत जास्त तीन महिने केले जाणार आहे. तसेच  प्रतिदिवस ५० रुपये, तर जास्तीत जास्त ५००० रुपये दंड आकारला जाणार आहे.

टॅग्स :मुंबई