लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाकाळात रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ लागू केल्यानंतर नवे दर मीटरमध्ये दिसण्यासाठी आवश्यक असणारी मीटर अद्ययावतीकरण प्रक्रिया सध्या पूर्णपणे थांबली आहे. कोरोना संसर्गाच्या संकटात रिक्षा-टॅक्सीचालकांना दिलासा देण्यासाठी अद्यावतीकरणाला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन विभागाने दिली.
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या २२ फेब्रुवारीच्या बैठकीत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना भाडेवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात ३ रुपये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानुसार रिक्षाचे किमान भाडे २१ आणि टॅक्सीचे किमान भाडे २५ रुपये झाले आहे, तसेच मीटर अद्ययावतीकरण करण्यासाठी ३१ मे २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या निर्देशाप्रमाणे रिक्षा आणि टॅक्सी मीटरचे कामकाज १५ एप्रिल २०२१ पासून होऊ शकले नाही. रिक्षा टॅक्सी मीटर अद्ययावतीकरणाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणच्या ३१ मे रोजीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
मीटर कॅलिब्रेशन प्रक्रियेसाठी मीटर काढणे, सॉफ्टवेअर अपडेट करणे, आरटीओची मंजुरी घेणे अशी वेळखाऊ प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ७५०-१००० रुपयांपर्यंत खर्च येतो. लॉकडाऊन काळात कमाई नसल्याने या खर्चाचा अतिरिक्त भार चालकांना सहन करावा लागत आहे. त्यातच आरटीओमध्ये दलालांचे जाळे पसरल्याने जलदगतीने काम करण्यासाठी अधिक २०० ते ५०० रुपये चालकांकडून वसूल केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
......................................