मुंबई : गॅसच्या दरवाढीमुळे १ ऑगस्ट रोजी टॅक्सी संघटनेने संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सरकारने भाडेवाढ लवकरच करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अद्यापही भाडेवाढ होत नसल्याने गुरुवारपासून (दि. १५) पुन्हा संपावर जाण्याचा इशारा मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने दिला आहे. दरम्यान, मंगळवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक होणार असून, या बैठकीत तोडगा न निघाल्यास संप अटळ आहे.
टॅक्सी मेन्स युनियनने सरचिटणीस ए. एल. क्वाड्रोस म्हणाले की, खटुआ समितीच्या निर्देशानुसार महागाई निर्देशांक तपासून रिक्षा, टॅक्सीचालकांना भाडेवाढ देण्यात यावी, अशी रिक्षा-टॅक्सी संघटनांची मागणी आहे. गेल्या चार महिन्यांपासून रिक्षा, टॅक्सीचालक भाडेवाढीच्या प्रतीक्षेत आहे. यावेळी टॅक्सी संघटनांनी किमान भाडे ३५ रुपये करण्याची मागणी केली आहे, तर रिक्षाचालकांनी किमान भाडे २५ रुपये करण्याची मागणी केली आहे. अद्याप मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणची (एमएमआरटीए) बैठकही झाली नसल्याने रिक्षा-टॅक्सी संघटनांमधून संताप व्यक्त केला जात आहे. शिवाय भाडेवाढीच्या लेखी आश्वासनानंतरही भाडेवाढ झाली नाही. टॅक्सीचे किमान भाडे ३५ आणि रिक्षाचे किमान भाडे २५ व्हायला हवे त्यापेक्षा भाडेवाढ केल्यास आम्ही संपावर जाणार आहोत.