मुंबई : कोरोनाच्या काळात रिक्षा, टॅक्सी चालकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे भाडेवाढ करण्याची मागणी रिक्षा, टॅक्सी चालक संघटनानी केली असून त्याला परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. यासंदर्भात मंगळवारी एमएमआरटीएची बैठक होणार असून त्यामध्ये भाडेवाढीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.एमएमआरटीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून टॅक्सी आणि रिक्षा या दोन्हींसाठी प्रलंबित असलेल्या भाडेवाढीचा प्रस्ताव आम्ही तयार केला आहे. यावर बैठकीत चर्चा केली जाईल. दरवाढ मोजण्यासाठी मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) खटुआ समितीच्या सूत्राला यापूर्वीच मंजुरी दिली असून दरवाढ केवळ त्यावर आधारित असेल.रिक्षाचे सध्याचे मीटर भाडे १८ रुपये आणि टॅक्सीचे २२ रुपये आहे. जून २०१५ मध्ये टॅक्सीच्या भाडेदरात १ रुपयाने वाढ करण्यात आली होती. त्यामुळे २१ रुपयांवरून भाडे २२ रुपये झाले होते. तर याच वर्षात रिक्षाच्याही भाडेदरात एक रुपयाची वाढ झाली होती. ही भाढेवाढ हकीम समितीनुसार प्रत्येक वर्षी दिली जात होती. परंतु या समितीच्या सूचना प्रवाशांच्याही हिताच्या नसल्याने त्याविरोधात प्रवासी संघटनांनी विरोध दर्शविला. त्यानंतर एकसदस्यीय खटुआ समितीची शिफारस करण्यात आली, परंतु रिक्षा, टॅक्सीच्या भाडेदरावर काहीही निर्णय झाला नाही.
बैठकीत अंतिम निर्णयरिक्षा, टॅक्सी भाडेवाढ, रिक्षा, टॅक्सी कल्याणकारी मंडळ तसेच परवाना बंद करण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याला परिवहनमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. याबाबत मंगळवारच्या एमएमआरटीएच्या बैठकीत निर्णय होणार आहे.- राजेंद्र देसाई, सरचिटणीस, महाराष्ट्र रिक्षाचालक संघटना
अशी हाेईल भाडेवाढबैठकीत रिक्षाचे भाडे २ आणि टॅक्सी भाडे ३ रुपयांनी वाढण्याबाबत तसेच मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा आणि टॅक्सीचे माेफत परवाने बंद करण्याबाबत निर्णय होणार आहे.