फेरीवाल्यांवरून मुंबईत पुन्हा राडा! दादरमध्ये काँग्रेस-मनसे कार्यकर्ते भिडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 03:47 AM2017-11-02T03:47:31+5:302017-11-02T03:47:39+5:30

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून आमने-सामने आलेल्या काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी पुन्हा एकदा राडा केला. फेरीवाला सन्मान मार्चसाठी दादरमध्ये जमलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी बटाटे फेकून मारत हा मोर्चा उधळून लावला.

Riders again in Mumbai from hawkers! Congress-MNS activists in Dadar Bhadale said | फेरीवाल्यांवरून मुंबईत पुन्हा राडा! दादरमध्ये काँग्रेस-मनसे कार्यकर्ते भिडले 

फेरीवाल्यांवरून मुंबईत पुन्हा राडा! दादरमध्ये काँग्रेस-मनसे कार्यकर्ते भिडले 

Next

मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून आमने-सामने आलेल्या काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी पुन्हा एकदा राडा केला. फेरीवाला सन्मान मार्चसाठी दादरमध्ये जमलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी बटाटे फेकून मारत हा मोर्चा उधळून लावला. या प्रकरणी मनसेच्या १५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचवेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या वर्सोव्यातील घराबाहेर दबा धरून बसलेल्या सुमारे १५ मनसे कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
काँग्रेसचे सरचिटणीस नितीन पाटील यांनी दादरच्या नक्षत्र मॉलसमोरून सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास फेरीवाला सन्मान मोर्चा आयोजित केला होता. मात्र मोर्चा सुरू होण्याआधीच परिसरात दडून बसलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्लाबोल केला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधात घोषणा देत मनसे कार्यकर्त्यांनी जमावावर बटाटे फेकण्यास सुरुवात केली. यावेळी तैनात असलेल्या पोलिसांच्या फौजफाट्याने काँग्रेस आणि मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि निरुपम यांच्याविरोधात घोषणाबाजी करत परळ येथील काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली. शिवाय दादर येथील फेरीवाला सन्मान मोर्चाचे आयोजक नितीन पाटील यांच्या घराबाहेरील गाडीची तोडफोड केली. त्याविरोधात पाटील यांनी दादर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. भ्याड हल्ला करणाºया मनसे कार्यकर्त्यांनी माझ्या गैरहजेरीत गाडीवर हल्ला केला. हिंमत असेल, तर माझ्यासमोर गाडी फोडून दाखवावी, असे आव्हान पाटील यांनी मनसेला दिले आहे. मनसेच्या भ्याड हल्ल्याने काँग्रेस घाबरणार नसून यापुढेही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन केले जाईल. गरीब फेरीवाल्यांसाठी काँग्रेस रस्त्यावरील लढाई लढत राहील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

१५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
दादरमधील फेरीवाला सन्मान मोर्चावर हल्ला केल्याबद्दल मनसेच्या १५ कार्यकर्त्यांवर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
त्यात मनसेचे भायखळा विधानसभा अध्यक्ष संजय नाईक, माजी विभागाध्यक्ष विजय लिपारे, शिवडी उपविभागाध्यक्ष संतोष नलावडे, शिवडी शाखाध्यक्ष निलेश इंदप या पदाधिकाºयांसह विनोद लोके, मिलिंद पांचाळ, सोहेल शेख, प्रकाश पवार, विनोद बाविस्कर, पराग भोळे, केतन नाईक, निवृत्ती पवार, अक्षय भाटकर, विनय पाताड, हेमंत पाटील या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

मनसेचा गनिमी कावा!
काँग्रेसने आयोजित केलेल्या फेरीवाल्यांच्या दादरमधील मोर्चाला मनसेचा कडाडून विरोध होणार असल्याची पूर्वकल्पना पोलिसांना होती. त्यामुळे दादरमध्ये बुधवारी सकाळपासूनच कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मात्र पोलिसांची नजर चुकवण्यासाठी मनसेने मोर्चा उधळण्यासाठी दादरऐवजी भायखळा आणि शिवडी विधानसभेतील कार्यकर्त्यांकडे कामगिरी सोपवली. मनसेचा हा गनिमी कावा यशस्वीही झाला.

संजय निरूपम नजरकैदेत!
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी घराबाहेर पडू दिले नाही, असा दावा मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
त्या म्हणाल्या की, निरुपम यांनी दादर मोर्चात भाग घेतल्यास मनसे स्टाइलने आंदोलनाचा इशारा पोलीस उपायुक्त परमजीत सिंग दहिया यांना दिला होता. त्यावर दहिया यांनी निरुपम यांना घराबाहेर पडू देणार नसल्याचे सांगितले.
तरीही निरुपम घराबाहेर पडू नयेत, म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निदर्शने केल्याचा दावा ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी निरुपम यांच्या घराबाहेर दबा धरून बसलेल्या काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

राज ठाकरेंकडून ‘त्यांचे’ कौतुक!
दादरमधील फेरीवाला मार्च उधळून लावणाºया १५ कार्यकर्त्यांच्या पाठीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंज बंगल्यावर शाबासकीची थाप दिली.
तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणारे पत्र सर्व पोलीस ठाणे, रेल्वे स्थानके आणि महापालिका वॉर्ड कार्यालयांत देण्याचे आदेश ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिले आहेत.
सोबतच कार्यवाही न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा अल्टीमेटम द्या, असे राज ठाकरे यांनी सांगितल्याची माहिती एका पदाधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली आहे.

Web Title: Riders again in Mumbai from hawkers! Congress-MNS activists in Dadar Bhadale said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई