काखेत कळसा, गावाला वळसा !
By Admin | Published: September 11, 2014 12:40 AM2014-09-11T00:40:07+5:302014-09-11T00:40:07+5:30
उस्मानाबाद : पर्यटन महामंडळाच्या विविध योजना तसेच प्रसार, प्रचारामुळे वेरूळ-अजिंठा, महाबळेश्वरसह थेट काश्मिर-कन्याकुमारीला पर्यटनासाठी जाणाऱ्यांची जिल्ह्यात मोठी संख्या आहे.
उस्मानाबाद : पर्यटन महामंडळाच्या विविध योजना तसेच प्रसार, प्रचारामुळे वेरूळ-अजिंठा, महाबळेश्वरसह थेट काश्मिर-कन्याकुमारीला पर्यटनासाठी जाणाऱ्यांची जिल्ह्यात मोठी संख्या आहे. मात्र, यातील अनेकांनी जिल्ह्यातील पर्यटन स्थळे मात्र अद्यापही पाहिली नसल्याचे ‘लोकमत’च्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. परंडा आणि नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यांना इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, जिल्ह्यातील तब्बल ९२ टक्के जणांनी अद्यापही परंड्याचा किल्ला पाहिलेला नाही तर महामार्गावर असलेला नळदुर्ग किल्ल्याकडेही जिल्ह्यातील तब्बल ६३ टक्के जणांचे दुर्लक्ष असल्याचे हा सर्वे सांगतो.
‘पर्यटनाला चला’ असे अनेक दिग्गज कलावंत जाहिरातींच्या माध्यमातून आपणाला आवाहन करीत असतात. पर्यटन महामंडळाच्या यासाठी विविध योजनाही आहेत. या योजनांचा अनेकजण लाभ घेतात. उस्मानाबादसह जिल्ह्यातून नित्यनियमाने वेरूळ-अजींठा, माथेरान, महाबळेश्वरसह कोकणात अनेकजण मित्रपरिवार, कुटुंबियांसह पर्यटनाला जातात. ही पर्यटनस्थळे सर्वसामान्यांना आकर्षित करणारी आहेतच. पण, याच तोडीची पर्यटन स्थळे जिल्ह्यात आपल्या अवतीभोवती असताना ‘घर की मुर्गी, दाल बराबर’ याप्रमाणे आपण आपल्या घरापासून काही किमी अंतरावर असणाऱ्या या स्थळांकडे मात्र कानाडोळा करीत असल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
जिल्ह्यातील कोणत्या ऐतिहासिक स्थळांच्या अनुषंगाने ‘लोकमत’ने सर्वेक्षण केले असता जिल्ह्यातील तब्बल ७० टक्के जणांनी अद्यापही तेरचा ऐतिहासिक वारसा पाहिलेला नाही. तेर येथे गोरोबा काकांच्या मंदिरासह पुराण वस्तू संग्रहालय आहे. अशीच स्थिती धाराशीव लेण्यांचीही आहे. उस्मानाबाद शहरापासून केवळ तीन-चार किमीवर असलेली ही लेणी अद्यापही ६५ टक्के जणांनी पाहिलेली नाही.
परंडा आणि नळदुर्गच्या किल्ल्याला तर इतिहासात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते. मात्र, असे असतानाही तब्बल ९२ टक्के जणांनी परंड्याचा किल्ला तर ७३ टक्के नागरिकांनी नळदुर्गचा किल्ला अद्याप पाहिलेला नाही. विशेष म्हणजे, हे किल्ले पाहण्यासाठी इतिहास तज्ज्ञांबरोबरच राज्यभरातील पर्यटक या ठिकाणी येत असताना आपल्याकडून मात्र त्याकडे कानाडोळा होत असल्याचेच सर्वेक्षणातील या आकडेवारीवरून स्पष्ट होते. (प्रतिनिधी)
सर्वेक्षणावेळी अनेकांनी नळदुर्ग, परंडा किल्ल्यासह रामलिंग, धाराशीव लेणी, हातलाई डोंगर तसेच जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळे आपल्याला आवडत असल्याचे सांगितले आहे. पायाभूत सुविधांबाबत ७४ टक्क़े पर्यटक नाराज असून, या पर्यटन स्थळांचा विकास समाधानकारक होत असल्याचे फक्त १४ टक्के पर्यटकांनी म्हटले आहे. १२ टक्के नागरिकांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला असला तरी पर्यटकांनी व्यक्त केलेली ही मते पाहता जिल्हा प्रशासन तसेच राज्य शासनाने उस्मानाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी अधिक गांभिर्याने प्रयत्न करायला हवेत, हीच बाब या सर्वेक्षणातून स्पष्ट होत असल्याचे समोर येते.
राज्य व केंद्र शासनाच्या वतीने पर्यटनवृध्दीसाठी अनेक योजना राबविण्यात येतात. पर्यटन स्थळांच्या विकासासाठीही केंद्र तसेच राज्य पातळीवरून प्रयत्न होतात. मात्र, जिल्हा पातळीवर याबाबतीत फारशी समाधानकारक स्थिती नाही. नागरिकांना खऱ्या अर्थाने पर्यटनाकडे वळवायचे असेल तर जनतेला आपल्या परिसरात असलेल्या पर्यटन स्थळांची माहिती द्यावी लागेल. याबरोबरच पर्यटन स्थळांचा विकास झाल्यास तेथील स्थानिकांची कशी प्रगती होऊ शकते, हे समजाऊन सांगत त्यांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे लागेल, असे मत आनंद गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. पर्यटन स्थळांचा विकास करताना स्थानिक लोकांची मते लक्षात घ्यावीत, असे काकासाहेब सिरसाट यांनी सूचविले आहे. द्रौपदी मस्के यांनीही पर्यटन स्थळाच्या विकासामध्ये स्थानिकांचा सहभाग वाढविण्याची गरज व्यक्त केली आहे.
श्री क्षेत्र तुळजापूरची राज्यभरात ओळख आहे. त्यामुळे विकास कामांसाठी तुळजापूरसाठी मोठा निधी मिळतो. मात्र, जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळे विकसित झाल्यास तुळजापूरला येणारे अनेक पर्यटक जिल्ह्यातील इतर स्थळांनाही भेटी देतील. त्यामुळे तुळजापूर प्रमाणेच परंडा, नळदुर्ग किल्ला तसेच इतर पर्यटन स्थळांना निधी मिळायला हवा, असे सत्यजीत सिरसाट यांनी सांगितले. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्थानिक लोकांनी पुढाकार घ्यायला हवा. पर्यटन स्थळ परिसरात स्वच्छता राखण्याची गरज कुमार हिंगे यांनी व्यक्त केली आहे. तर वाढत्या पर्यटनामुळे स्थानिकांनाच रोजगार मिळेल, हे नागरिकांना समजावून सांगायला हवे, असे प्रभाकर सरवदे यांनी म्हटले आहे.
या सर्वेक्षणानुसार पर्यटनाला जाणाऱ्यांपैकी तब्बल ७४ टक्के नागरिक आपल्या मित्रपरिवारासह ऐतिहासिक स्थळांचा आनंद घेतात. १८ टक्के नागरिक कुटुंबवत्सल असल्याचे यातून दिसून आले. ते आपल्या मुला-बाळांसह पर्यटनाचा आनंद लुटतात. तर ८ टक्के नागरिक ‘एकला चलो रे’ असे म्हणत लेणी, किल्ल्यांचे ऐश्वर्य डोळ्यात साठवितात. असे असले तरी यातील निम्या म्हणजेच सुमारे ५० टक्के पर्यटकांनी पर्यटनस्थळी पुरेशा पायाभूत सुविधा नसल्याची खंत या सर्वेक्षणावेळी व्यक्त केली आहे. ४४ टक्के पर्यटकांनी काही प्रमाणात सुविधा असल्याचे म्हटले आहे. तर केवळ ६ टक्क़े पर्यटक जिल्ह्यातील पर्यटन स्थळी असलेल्या सुविधांबाबत समाधानी असल्याचे सर्वेक्षणातील आकडेवारीवरून दिसून येते. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.