मुंबई - राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखी चिघळत चालला असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. त्यातच, त्यांची प्रकृती खालावली असून आज सकाळी नाकातून रक्त आल्याने मराठा समाज बांधवांनी चिंता व्यक्त केली आहे. जरांगे यांना या उपोषणात त्रास वाढत असल्याची सद्यस्थिती आहे. दुसरीकडे सरकारच्या बैठका सुरू असून विरोधकही जरांगे यांच्या प्रकृतीची काळजी असल्याचं सांगत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणावर भाष्य करताना, सरकारला धारेवर धरलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालल्याने मराठा बांधव व महिला या उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. सर्वांकडूनच त्यांना पाणी व उपचार घेण्याची विनवणी केली जात आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दात नकार दिल्याने उपस्थित महिला व बांधव भावूक झाले आहेत. अंतरवाली सराटीत समाजबांधवांचा ओघ वाढत चालला असून त्यांच्या प्रकृती बद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे आता राजकीय वर्तुळातही जरांगे यांच्या उपोषणावर प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी मनोज जरांगेंवर तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. तर, यासंदर्भात सुप्रिया सुळेंना विचारले असता, राणे हे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, ते केंद्रीयमंत्री आहेत. त्यामुळे, त्यांच्या विधानावर मी प्रतिक्रिया देणे उचित नाही, ते कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलले आहेत हे मला माहिती नाही. त्यामुळे, माझ्यावरील संस्कार जपून मी त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देणार नाही, असेही सुळेंनी म्हटले आहे.
जरांगे पाटलांची तब्येत हीच आत्ता माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. जरांगे पाटील यांना न्याय कसा मिळेल, ही आपण सर्वांनी माणूसकीच्या नात्याने चर्चा केली पाहिजे. मनोज जरांगे हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, पण आरक्षणासाठी हे सरकार असंवेदनशीलपणे वागत असून हे दुर्दैवी आहे. मराठा, धनगर, लिंगायत आणि व्हीजेएनटी आरक्षणाबाबत हे ट्रीपल इंजिन सरकार, खोके सरकार पूर्णपणे फेल आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले. तसेच, मी प्रकाश आंबेडकर यांनाही फोन करुन मार्गदर्शन घेईल, चर्चा करेल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मनोज जरांगे यांनी जालन्यातून लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी ऑफर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आला होता.
काय म्हणाले नारायण राणे
मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखव. तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत.