Join us  

कालावधी संपेपर्यंत ‘अधिकार’

By admin | Published: April 24, 2015 3:51 AM

ज्या शिक्षण मंडळाचा कालावधी संपेल त्यांचे अधिकार संपुष्टात येतील असे आदेश राज्यशासनाने जारी केल्याने केडीएमसीच्या शिक्षण मंडळ सदस्यांना

कल्याण : ज्या शिक्षण मंडळाचा कालावधी संपेल त्यांचे अधिकार संपुष्टात येतील असे आदेश राज्यशासनाने जारी केल्याने केडीएमसीच्या शिक्षण मंडळ सदस्यांना दिलासा मिळाला आहे. या आदेशानुसार महापालिका आयुक्त मधुकर अर्दड यांनी कालावधी न संपलेल्या मंडळाच्या सदस्यांना पुन्हा ‘अधिकार’ बहाल केले आहेत.२६ जून २०१४ ला शासनाने दिलेल्या एका आदेशानुसार शिक्षण मंडळ सदस्यांना असलेले अधिकार संपुष्टात आल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते. यावर केडीएमसी प्रशासन आणि शिक्षण मंडळ सदस्य यांच्यात वाद रंगला होता. शासनाने अस्तित्वात असलेल्या शिक्षण मंडळ समितीच्या सदस्यांचे अधिकार त्यांच्या मुदतीपर्यंत कायम ठेवण्याचे स्पष्ट केल्याचे सदस्यांचे म्हणणे होते तर मंडळाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. त्यांना कोणताही अधिकार नाही यावर प्रशासन ठाम होते. प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात सदस्यांनी लाक्षणिक उपोषण छेडले होते. तर महापालिकेच्या महासभेत १९ जानेवारी २०१५ला लोकप्रतिनिधींनी प्रस्ताव मंजूर करून सदस्यांना पुन्हा अधिकार द्या असे आदेश प्रशासनाला दिले होते. परंतू याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. दरम्यान शासनाच्या शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी १ एप्रिल रोजी काढलेल्या पत्रकानुसार शिक्षण मंडळ सदस्यांचा कालावधी समाप्त होईपर्यंत त्यांचे अधिकार कायम राहतील असे स्पष्ट केले आहे. यावर शासनाच्या निर्णयाने दिलासा मिळाला असून उशीरा का होईना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया उपसभापती अमित म्हात्रे यांनी दिली. (प्रतिनिधी)