योग्य उपचार, सकारात्मक दृष्टिकोनातून मोनिकाने केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:07 AM2021-04-30T04:07:49+5:302021-04-30T04:07:49+5:30
रेल्वे अपघातात गमावले हाेते दाेन्ही हात लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : रेल्वे अपघातात जखमी झालेल्या हाताच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार ...
रेल्वे अपघातात गमावले हाेते दाेन्ही हात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रेल्वे अपघातात जखमी झालेल्या हाताच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडलेल्या मोनिका मोरे हिने कोरोनाच्या संसर्गावर मात केली. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर परीक्षा देणाऱ्या मोनिकाने पुन्हा एकदा कोरोनाच्या संसर्गालाही हरविले आहे. कोरोनाच्या खडतर काळात सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य उपचार घेतल्यास आपण कोरोनाला हरवू शकतो, असेही मोनिकाने आवर्जून सांगितले.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात मोनिकासह तिच्या कुटुंबीयांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. त्यात आजी, आई आणि भावालाही लागण झाली होती; मात्र त्वरित निदान आणि योग्य उपचारांमुळे संसर्गावर नियंत्रण मिळविणे सोपे झाल्याची माहिती मोनिकाच्या डॉक्टरांनी दिली. डॉ. नीलेश सातभाई यांनी या उपचारप्रक्रियेविषयी सांगितले की, मोनिकाच्या हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर तिला काही औषधे सुरू होती, त्यात अवयवाने शरीराशी जुळवून घ्यावे, याकरिता औषधोपचार सुरू होते. त्यातून कोरोनाच्या संसर्गाचा धोका होता आणि तो खरा ठरला.
उपचारांच्या प्रक्रियेत मोनिकाने मानसिकरीत्या सक्षम राहून या सगळ्याला तोंड दिले. मोनिकाच्या हातामध्ये पुन्हा क्षमता पुनरुज्जीवीत होत आहे. तिची फिजोओथेरपी सुरू आहे. आता या थेरपीच्या मदतीने पुन्हा एकदा सामान्यतः काम करण्यास सुरू होईल. तोवर तिच्या प्रकृतीची काळजी घेणे, योग्य उपचार आणि व्हिडिओ काॅलवरून संवाद साधणे सुरू असल्याचे डॉ. सातभाई यांनी सांगितले. तर मोनिकावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होऊनही कोरोनावर तिने मात केली, त्यामुळे आताच्या तीव्र संसर्गाच्या काळात सकारात्मक दृष्टिकोन, लवकर निदान करून उपचार प्रक्रियेत आल्यास सर्वांना कोरोनावर मात करणे शक्य आहे, याची जाणीव माेनिकाने करून दिली.
...................................