Join us

रूळ ओलांडणाऱ्यांवर कठोर कारवाई

By admin | Published: December 10, 2015 2:24 AM

मध्य रेल्वेवर रुळ ओलांडताना होणारे अपघात कमी करण्यासाठी मध्य रेल्वेवर कलम १४७ लागू करण्याचे आदेश महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांनी रेल्वे सुरक्षा दलाला दिले आहेत.

मुंबई : मध्य रेल्वेवर रुळ ओलांडताना होणारे अपघात कमी करण्यासाठी मध्य रेल्वेवर कलम १४७ लागू करण्याचे आदेश महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांनी रेल्वे सुरक्षा दलाला दिले आहेत. त्यानुसार बुधवारपासून कारवाई करत धरपकड सुरु केली. दिवसभरात ३४१ जणांना पकडण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.रेल्वे रुळ ओलांडताना मागील वर्षी १,९१२ जणांचा मृत्यू तर ४८६ प्रवासी जखमी झाले होते. तर २0१५ मध्ये १,५१२ जणांचा मृत्यू झाले असून ३८६ जण जखमी झाल्याची नोंद आहे. रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातात वर्षाला दीड हजारहून जास्त प्रवाशांच्या मृत्यूची नोंद होत असल्याने शून्य अपघात मोहीम करण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी अचानक धाड टाकून रुळ ओलांडणाऱ्यांविरोधात मोहीमही नुकतीच सुरू केली. या आधीही रेल्वेच्या कलम १४७ नुसार रुळ ओलांडणाऱ्यांविरोधात कारवाई होत होती. मात्र ही कारवाई कठोरपणे होत नसल्याचे निदर्शनास आले आणि महाव्यवस्थापकांनी यात हस्तक्षेप केला. महाव्यवस्थापकांच्या आदेशानुसार बुधवारपासून या कलमाची कठोर अंमलबजावणी करण्यात आली आणि ३४१ जणांवर कारवाई केल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेन्द्र पाटील यांनी सांगितले. या कारवाईनुसार सहा महिन्याची शिक्षा किंवा एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा प्रवाशांना होऊ शकतात, असे पाटील म्हणाले. साधारपणे पंधरा दिवस ही विशेष मोहीम सुरु राहिल आणि त्यानंतर पुढे आणखी किती दिवस मोहीम सुरु ठेवणे गरजेचे आहे ते पडताळून पाहिले जाईल.