मुंबई - कुंभमेळ्याला जाण्यासाठी दक्षिणा मागण्याच्या बहाण्याने एका व्यापाऱ्याची सोन्याची अंगठी दोन साधूंनी पळवल्याचा प्रकार कांदिवली परिसरात घडला. याप्रकरणी समतानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कांदिवली पूर्वेकडील आकुर्ली रोड परिसरातील नवयुवक सोसायटीत राहणारे परमेश्वर मिश्रा (वय ४७) ११ जानेवारी रोजी प्रकृती ठीक नसल्याने घरी आराम करत होते. त्याच वेळी दुपारी अडीचच्या सुमारास साधूच्या वेशात दोन अनोळखी व्यक्ती तेथे आले आणि त्यांनी मिश्रा यांच्या पत्नीकडे पाणी मागितले.
मिश्रा यांच्या पत्नीने त्यांना घरात बसायला सांगत, ती पाणी आणायला किचनमध्ये गेली. तेव्हा झोपेत असलेल्या मिश्राच्या डोक्यावर साधूंनी हात फिरवत ‘भक्त उठो आपको आराम मिलेगा’ असे म्हटले. त्यामुळे ते ऐकून मिश्रा जागे झाले आणि साधूंनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांनी मिश्रा यांचा हात हातात घेऊन ‘आम्ही कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जात असून, त्यासाठी सहखुशीने दक्षिणा द्या’ असे सांगितले.
११ हजारांची मागणी व्यापाऱ्याने पत्नीला एक हजार रुपये साधूला द्यायला सांगितले. त्यावर ‘ते पैसे तुम्हीच ठेवा, त्यात आमच्या दोघांचे तिकीटही मिळणार नाही,’ असे म्हणत त्यांनी ११ हजार रुपये मागितले. मिश्रा यांनी तेव्हा त्यापैकी एकाच्या मोबाइल क्रमांकावर ५,१०० रुपये पाठवले. चोरट्यांनी मिश्रा यांच्या बोटातील ७५ हजारांची सोन्याची अंगठी पाहण्यासाठी मागितली. त्यांनी अंगठी दिली. मात्र, बोलण्याच्या नादेत ते अंगठी घेण्यास विसरले.
चोरटे पोहोचले नाशिकलामिश्रा यांना झोपेतून जाग आल्यानंतर दक्षिणा दिलेल्या व्हॉटसॲप नंबरवर साधूंकडे अंगठीची विचारणा केली. त्यावर अनोळखी साधूंनी नाशिकमध्ये असल्याचे सांगत दोन-तीन दिवसांत अंगठी परत आणून देतो असे सांगितले; मात्र त्यानंतर त्यांचा फोन बंद येऊ लागला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने मिश्रा यांनी समतानगर पोलिसांत धाव घेतली.