'घमेंडीच्या विरोधात लोकांची मुसंडी', व्यंगचित्राऐवजी चक्क मथळ्यातून 'राजटोला'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 06:51 PM2018-12-11T18:51:23+5:302018-12-11T18:55:29+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच मोदी सरकारच्या कारभारावर टीका करताना आपण पाहिले आहेत.
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर भाजपाला खोचक टोला लगावला आहे. 'घमेंडी'च्या विरोधात लोकांनी मारलेली 'मुसंडी', असा मथळाच राज ठाकरेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. नेहमी व्यंगचित्राच्या माध्यमातून मोदी सरकारवर आणि सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर टीका करणाऱ्या राज यांनी यावेळी वन लाईन मथळ्यातून टीका केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच मोदी सरकारच्या कारभारावर टीका करताना आपण पाहिले आहेत. आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांसह सत्ताधाऱ्यांवर राज ठाकरे आगपाखड करतात. मात्र, यावेळी राज यांनी आपली शैली बदलली आहे. चक्क वर्तमान पत्रात देतात, तसा मथळा देत राज ठाकरेंनी देशातील पाच राज्यांच्या निकालावर आपले मत मांडले आहे. 'घमेंडी'च्या विरोधात लोकांनी मारलेली 'मुसंडी' असा मथळा राज यांनी दिला आहे. त्यासोबतच, विधानसभा निवडणुक 2018 असा हॅशटॅगही राज यांनी जोडला आहे. म्हणजेच जनतेचा कौल हा घमेंडी सरकारच्या विरोधात होता, असे राज यांनी सूचवले आहे. घमेंडी मोदी सरकारविरोधात लोकांनी जोरदार मुसंडी मारल्याचे राज यांनी म्हटलंय.
राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निकालामुळे भाजपच्या विजयी रथाला ब्रेक लागला असून गुजरात अन् कर्नाटक निवडणूक निकालानंतर जल्लोष करणाऱ्या भाजपा कार्यलयात आज शांती-शांती दिसून येत आहे. राजस्थानमध्ये वसुंधराराजे यांच्या नेतृत्वात भाजपने निवडणूक लढवली. मात्र, भाजपला येथे सत्ता गमवावी लागली. तर मध्य प्रदेशमध्येही भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे येथील सत्तेच्या सारीपाटावरुन पायउतार व्हावे लागले आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमध्येही जोतिर्रादित्य सिंधिया यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे अच्छे दिन आल्याचे दिसून येते. तसेच, तेलंगणात भाजपला सपाटून मार खावा लागला आहे. गतवर्षीच्या निवडणुकांमध्ये तेलंगणात भाजपाला 5 जागांवर विजय मिळाला होता. यंदा भाजपाचा एकच उमेदवार तेलंगणातून निवडणून आला आहे. तेलुगू लोकांनी भाजपला नाकारत प्रादेशिक पक्ष असलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीला स्पष्टपणे स्विकारले आहे. त्यानंतर, सर्वच विरोधी राजकीय पक्षांकडून भाजपाविरोधी सूर आवळण्यात येत आहे. त्याचा पार्श्वभूमीवर राज ठाकरेनी वनालाईन टीका केली आहे. दरम्यान, आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवरही सोमवारी राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. पटेल यांच्यावर दबाव आणून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याने सरकारची आता उलटी गिनती सुरू झाल्याचे राज यांनी म्हटले होते.
'घमेंडी'च्या विरोधात लोकांनी मारलेली 'मुसंडी'. #AssemblyElectionResults2018#AssemblyElections2018
— Raj Thackeray (@RajThackeray) December 11, 2018