पालिकेत रिपाइंचा स्वबळाचा नारा
By admin | Published: February 11, 2015 12:29 AM2015-02-11T00:29:39+5:302015-02-11T00:29:39+5:30
एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरपीआय पक्षाने (आठवले गट) स्वबळाचा नारा दिला आहे.
नवी मुंबई : एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरपीआय पक्षाने (आठवले गट) स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेना आणि भाजप या मित्रपक्षांकडून जागावाटपासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. मात्र त्यात समाधानकारक तोडगा न निघाल्यास स्वबळावर २८ जागा लढविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आरपीआयच्या निवडणूक कमिटीची सोमवारी वाशीत बैठक झाली. कमिटीचे अध्यक्ष तथा पक्षाचे कार्याध्यक्ष सुमंतराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. आरपीआय हा राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीचा घटक पक्ष आहे. मात्र महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांकडून आरपीआयला सन्मानाची वागणूक मिळत नसल्याची खंत आरपीआयच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. पक्षाचे अध्यक्ष, खासदार रामदास आठवले सुद्धा या दोन्ही पक्षांच्या कार्यप्रणालीवर नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत एखाद्या पक्षाच्या मागे फरफटत जाण्यापेक्षा स्वबळावर लढून ताकद आजमावण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यानुसार येत्या निवडणुकीत पक्षातर्फे निवडक अशा २८ जागांवर उमेदवार उभे करण्यात येणार असल्याची माहिती सुमंतराव गायकवाड यांनी दिली. यासंदर्भात लवकरच कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जागावाटपासंदर्भात भाजप आणि शिवसेना या मित्रपक्षांबरोबर बोलणी करण्यात येणार आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास स्वबळावर निवडणुका लढविल्या जातील, असे नवी मुंबई अध्यक्ष सिद्राम ओहोळ यांनी सांगितले. पक्षाचे केंद्रीय सदस्य सुरेश बारशिंगे, शिक्षण समिती सभापती सुधाकर सोनवणे, प्रदेश सचिव महेश खरे, नवी मुंबईचे कार्याध्यक्ष आप्पा शिवशरण आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)