Join us

रिपाइंच्या राष्ट्रीय उपाध्यक्षाचा शेजाऱ्याशी वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दयाल बहादुरे कल्याण पश्चिमेतील एका सोसायटीत राहत असून, त्यांचा शेजाऱ्यांशी वाद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दयाल बहादुरे कल्याण पश्चिमेतील एका सोसायटीत राहत असून, त्यांचा शेजाऱ्यांशी वाद झाला. हा प्रकार कळताच हा वाद मिटविण्यासाठी केंद्रीय समाज कल्याणमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी सायंकाळी कल्याणमध्ये धाव घेतली.

बहादुरे यांचे शेजाऱ्यांशी भांडण झाले. हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी बहादुरे व त्यांच्या शेजाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हा प्रकार समजताच आठवले बुधवारी सायंकाळी कल्याणमध्ये आले. बहादुरे यांच्या घरी आठवले येणार असल्याने साहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार व अन्य पोलीस तेथे पोहोचले. बहादुरे यांच्या घरीच पोलिसांसमोर त्यांनी न्याय-निवाडा करण्यास सुरुवात केली. या वेळी पोलिसांनी आठवले यांना घडलेल्या प्रकाराची पार्श्वभूमी सांगितली. तसेच तपास सुरू असल्याचे आश्वासन दिले.

या वेळी आठवले म्हणाले, ‘एका इमारतीत राहणाऱ्यांनी एकमेकांच्या विरोधात शेरेबाजी करून वाद अथवा भांडण करू नये. एकमेकांना सांभाळून घेत राहिले पाहिजे. याप्रकरणी पोलिसांनी योग्य कारवाई करावी.’

‘नवे वर्ष आर्थिकदृष्ट्या चांगले असेल’

- कोरोनामुळे २०२० वर्ष हे आर्थिक, सामाजिक व आरोग्यदृष्ट्या अत्यंत वाईट गेले. कोरोनाकाळात मलाही वाईट अनुभव आला. पाच राज्यांचा दौरा करत असताना लोकांशी संपर्क आाला. त्यामुळे मलाही कोरोना झाला. ११ दिवस बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. या काळात मी व्यायाम केला. वाचन केले. स्वत:चे १८ किलो वजन घटविले, असे आठवले म्हणाले.

- २०२१ हे वर्ष आर्थिकदृष्ट्या चांगले राहील. अनलॉकमध्ये सगळे व्यापार, उद्योग सुरू झाले आहेत. मात्र कोरोना काही पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे सगळ्य़ांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर करावा, आरोग्याबाबतचे नियम आपण पाळले पाहिजेत.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय सामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

फोटो - ३१ कल्याण-रामदास आठवले.

ओळ : रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दयाल बहादुरे यांच्या घरी केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले, पोलीस अधिकारी आदी. (छाया : मुरलीधर भवार)