मुंबई - कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशात कडक लॉकडाऊन लादण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच राष्ट्रीय लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यामुळे, लहान-सहान उद्योग धंद्यांपासून ते बड्यां कंपन्यांपर्यंत सर्वच ठप्प झाले होते. देशाच्या अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसला आहे. देश पहिल्या लाटेतून सावरतो ना सावरतो, तोच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं पुन्हा एकदा देशासमोर संकट उभारलंय. आता, या लाटेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भारताला बसत आहे. त्यामुळे, या ग्रामीण अर्थव्यवस्थेला ऑक्सिजन कोण देणार?, असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने निर्माण केलेले चित्र चिंताजनक आहे. पहिल्या लाटेत ज्या ग्रामीण अर्थव्यवस्थेने देशाच्या अर्थव्यवस्थेला तारले, त्या ग्रामीण भागावरच आता कोरोनाची कुऱ्हाड पडली आहे. शेती, कृषी उत्पादन आणि शेतकरी हा हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तो कणाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोडून पडला तर अर्थव्यवस्थेला ऑक्सिजन कोण देणार?, असा प्रश्न शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून विचारण्यात आला आहे. देशाच्या ग्रामीण भागात कोरोनाचे शिरकाव केला असून ग्रामीण जनजीवनच विस्कळीत झाले आहे.
ऑक्सिजन, इंजेक्शन, बेड आणि वैद्यकीय सुविधांचा मोठा अभाव ग्रामीण भागात जाणवत असून अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. राज्यातही गेल्या दीड महिन्यांपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे, सर्वच ठप्प झाले असून अनेकांचे रोजगारही बुडाले आहेत. सद्यस्थितीत केवळ जगण्यासाठीच संघर्ष सुरू आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात पुन्हा एकदा दुसऱ्यांदा टाळे लागल्याने देशासमोर अर्थव्यवस्थेचे मोठे संकट उभारले आहे.
तर अन्नधान्याची आयात करावी लागेल
सुनामीप्रमाणे उसळलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आता देशातील प्रत्येक राज्याला आपल्या मगरमिठीत घेतले आहे. पहिल्या लाटेत कोरोनाच्या राक्षसाने शहरी अर्थव्यवस्थेचा घास घेतला आणि आता ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कोरोनाची गिधाडे फडफडत आहेत. ग्रामीण भागाचे कंबरडे मोडणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अन्नधान्याचे उत्पादन, वितरण यासह ग्रामीण अर्थव्यवस्थेला जबर फटका बसतो आहे. त्यामुळे देशातील खाद्य क्षेत्रात महागाई भडकण्याचा धोका आहे. हे संकट अधिक लांबले तर भारताला अन्नधान्याची आयात करावी लागेल आणि जागतिक बाजारातील अन्नधान्याच्या किमतीवर त्याचा परिणाम होईल, अशी भीती आता जाणकार मंडळी व्यक्त करताना दिसत आहे.
गावखेड्यापर्यंत कोरोनाचा उच्छाद
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून पश्चिम बंगालपर्यंत प्रत्येक राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडविला आहे. मोठी महानगरे, शहरे, जिल्हा व तालुक्यांची ठिकाणे ते अगदी छोटय़ा गावखेडय़ा व तांडय़ांपर्यंत सगळीकडेच कोरोनाने उच्छाद मांडला आहे. कोविडच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक अक्राळविक्राळ आहे आणि दररोज ती देशात महासंहार घडवते आहे. अर्थव्यवस्थेलाही मरणासन्न अवस्थेला नेऊन पोहोचविण्याचे काम कोरोनाची दुसरी लाट करते आहे.