सोशल मीडियावर वाढतोय बनावट अकाऊंटचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:05 AM2021-07-05T04:05:52+5:302021-07-05T04:05:52+5:30

मुंबई : मित्र, मंडळी तसेच नातेवाईक यांच्या बनावट फेसबुक, इन्स्टाग्राम अकाऊंटवरून वैद्यकीय उपचारासाठी पैशांची गरज होती, अपघात झाला ...

Rise of fake accounts on social media | सोशल मीडियावर वाढतोय बनावट अकाऊंटचा विळखा

सोशल मीडियावर वाढतोय बनावट अकाऊंटचा विळखा

Next

मुंबई : मित्र, मंडळी तसेच नातेवाईक यांच्या बनावट फेसबुक, इन्स्टाग्राम अकाऊंटवरून वैद्यकीय उपचारासाठी पैशांची गरज होती, अपघात झाला आहे, अर्जंट पैसे पाठवा, असे संदेश धाडून फसवणुकीचे प्रकार वाढताना दिसत आहे. यात ठगांनी पोलिसांनाही सोडले नाही. यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांचेही बनावट खाते तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कुणालाही पैसे पाठविण्यापूर्वी खातरजमा करणे गरजेचे आहे.

गेल्या पाच महिन्यात बनावट फेसबुक अकाऊंटप्रकरणी १९ तक्रारी मुंबई पोलिसांच्या दफ्तरी नोंद झाल्या. त्यापैकी ४ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. तसेच सायबर पोलिसांकडे दाखल होणाऱ्या तक्रारीचे प्रमाण अधिक आहे. गेल्यावर्षी ३० घटना घडल्या. त्यापैकी ८ गुन्ह्याची उकल झाली, तर २०१९ मध्ये हाच आकडा ६१ होता. त्यापैकी २३ गुन्ह्यांची उकल करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांनी फेसबुकसह इतर सोशल मीडियाचा वापर करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर अपलोड करू नये, फोनवरून प्रत्यक्ष बोलून खात्री केल्याशिवाय पैसे पाठवू नये. प्रोफाईलमधील माहिती ओळखीच्या, जवळच्या व्यक्तींनाच दिसेल अशी सेटिंग करावी. ॲपची संपूर्ण तांत्रिक माहिती हवी.

सोशल मीडिया वापरताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करावा. त्याचा गैरवापर होणार नाही, याबाबत अधिक जागृत राहून सावधानता बाळगावी, असे आवाहनही सायबर पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.

कोरोना काळात तक्रारीत वाढ

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगारांकडून फेसबुकवरील बहुतांश अकाऊंट हॅक करतात. बनावट प्रोफाईल तयार करून संबंधित व्यक्तीच्या प्रोफाईलसोबत जोडलेल्या मित्र-मैत्रिणींच्या अकाऊंटवर मेसेज पाठवून पैशांची मागणी संकटकाळात मदत म्हणून केली जाते.

पोलिसांच्या ई-मेलनंतर कारवाई

बनावट अकाऊंटचा पर्दाफाश करण्यासाठी सायबर पोलीस ठाण्याकडे वेगळे असे कुठलेही पोर्टल अद्याप तरी अस्तित्वात नाही. बनावट अकाऊंटच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांकडून फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियाशी संबंधित मुख्यालयाकडे ई-मेलद्वारे तक्रार पाठविली जाते.

बनावट अकाऊंट दिसले तर हे करा..

बनावट अकाऊंट दिसले तर प्रथमत: त्या प्रोफाईलची पडताळणी होणे गरजेचे आहे. आपल्याच नावाचे वेगळे बनावट अकाऊंट तयार झाल्याचे लक्षात आले तर सर्वप्रथम त्या प्रोफाईलची यूआरएल कॉपी करून घेत आपल्या मूळ अकाऊंटच्या प्रोफाईलवरून संदेश वॉलद्वारे याबाबत आपल्या सोशल मीडियाच्या मित्र परिवाराला अवगत करावे. बनावट खात्याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात द्यावी. जेणेकरून फेसबुक असो किंवा इन्स्टाग्राम यासारख्या सोशल माध्यमांना ती कळविणे सोपे होईल. बनावट प्रोफाईलसंदर्भात आपल्या मित्र परिवाराला अधिकाधिक संख्येने फेसबुककडे ‘रिपोर्ट’ करण्याचे आवाहन करावे. जितके जास्त रिपोर्ट ऑनलाईनसंबंधित प्रोफाईलबाबत नोंदविले जातील, तेवढे लवकर ते खाते बंद होते.

आलेख

मुंबई पोलिसांकड़े दाखल गुन्हे

वर्ष- २०१९- तक्रारी - ६१

वर्ष- २०२०- तक्रारी- ३०

वर्ष-२०२१ (जानेवारी ते मेपर्यंत) - तक्रारी- १९

Web Title: Rise of fake accounts on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.