Join us

ऋषी कपूर यांचं गांधी परिवारावर वादग्रस्त ट्विट

By admin | Published: May 18, 2016 12:39 PM

ऋषी कपूर यांनी गांधी परिवारावर अप्रत्यक्षरित्या टीका करत देशामधील अनेक ठिकाणांना नेहरु - गांधी यांचं नाव देण्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 18 - अभिनेता ऋषी कपूर आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. ट्विटरवरुनदेखील त्यांनी केलेलं ट्विट अनेकदा वादाचा मुद्दा ठरला आहे. ऋषी कपूर यांनी गांधी परिवारावर केलेल्या ट्विटमुळेदेखील अशाच प्रकारे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ऋषी कपूर यांनी गांधी परिवारावर अप्रत्यक्षरित्या टीका करत देशामधील अनेक ठिकाणांना नेहरु - गांधी यांचं नाव देण्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. ऋषी कपूर यांनी सलग ट्विट करत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, राजीव गांधी फिल्म सिटी नाव देण्यावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. 
 
ऋषी कपूर यांनी गांधी कुटुंबांशी संबंधित व्यक्तींची नावे जागांना देण्यावरुन काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. 'देशाच्या संपत्तीचं गांधी कुटुंबांच्या नावे नामकरण करणं काँग्रेसने थांबवाव. वांद्रे - वरळी सी लिंकला लता मंगेशकर किंवा जेआरडी टाटा यांचं नाव देऊ शकतो. ही तुमची खासगी संपत्ती आहे का ?', असं ट्विट ऋषी कपूर यांनी केलं आहे. 
 
'इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ का ? महात्मा गांधी, भगत सिंग आणि आंबेडकर किंवा माझ्या नावावर का नाही ? असा सवालही ऋषी कपूर यांनी ट्विटवरुन उपस्थित केला आहे. 
 
'जर मोहम्मद रफी, मुकेश, मन्ना डे, किशोर कुमार यांची नावे ठिकाणांना दिली असती तर..विचार करा, मी फक्त सुचवत आहेट, असंही ऋषी कपूर बोलले आहेत. 
 
मुंबई फिल्म सिटीचं नामकरणही ऋषी कपूर यांना खटकलं आहे. 'फिल्म सिटीचं नाव दिलीप कुमार, देव आनंद, अशोक कुमार किंवा अमिताभ बच्चन यांच्या नावे असायला हवं. राजीव गांधी उद्योग  का ? विचार करा'. असं मत ऋषी कपूर यांनी मांडलं आहे.
 
'देशातील महत्वाच्या ठिकाणांना अशा लोकांचं नाव दिलं पाहिजे ज्यांनी देशासाठी योगदान दिलं आहे. प्रत्येक गोष्टीत गांधींचं नाव ? मी सहमत नाही आहे', असंही ट्विट केलं आहे. 
 
ऋषी कपूर एवढ्यावरच थांबले नाहीत. 'दिल्लीतील रस्ते बदलू शकतात तर मग काँग्रसेच्या संपत्तीचं नाव का बदललं जाऊ शकत नाही ? चंदीगडमध्ये होते तिथेपण राजीव गांधींची संपत्ती ? विचार करा ? का ?', असंही ऋषी कपूर बोलले आहेत.