निर्बंधांमुळे उत्पन्न तीन कोटींवर; प्रवासी संख्येत तब्बल २० लाखांची घट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आल्याचा परिणाम राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नावर झाला आहे. निर्बंधांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत तब्बल २० लाखांची घट नोंदवण्यात आली आहे. तर शुक्रवारी १६ एप्रिल राेजी उत्पन्न तीन कोटींवर आले.
राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. विशेषतः गावखेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार १ एप्रिल रोजी राज्यातील एसटी प्रवाशांची संख्या ३२ लाख २२ हजार होती आणि उत्पन्न ७.७८ कोटी होते. वीकेंड लॉकडाऊननंतर प्रवासी संख्येत घट होत गेली. १५ एप्रिलला कडक निर्बंध जारी करण्यात आल्यानंतर वाहतुकीला मोठा फटका बसला. प्रवासी संख्येत घट होऊन ती १२ लाख ४१ हजारांपर्यंत पोहोचली, तर शुक्रवार १६ एप्रिल २०२१ राेजी केवळ तीन कोटींचे उत्पन्न मिळाले. याआधी १ एप्रिलला ७.७८ काेटी एवढे उत्पन्न मिळाले हाेते.
कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता राज्यात वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यामुळे शनिवारी १० एप्रिल आणि रविवारी ११ एप्रिल रोजी प्रवासी संख्या कमी झालेली पाहायला मिळाले. ९ एप्रिल रोजी प्रवासी संख्या २९ लाख होती. १० एप्रिलला १३ लाख तर ११ एप्रिल रोजी घट होऊन ६.७७ लाखांवर आली.