इंधन दरवाढीमुळे महागणार सर्वसामान्यांच्या लालपरीचा प्रवास 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 06:50 AM2021-10-24T06:50:19+5:302021-10-24T06:51:00+5:30

ST bus : एसटी महामंडळाने २०१८ मध्ये १८ टक्के भाडेवाढ केली होती. त्यानंतर कोरोनामुळे कोणतीही भाडेवाढ केलेली नाही. एसटीचे दररोज २१ कोटींचे उत्पन्न कोरोनामुळे काही लाखांवर आले होते. सध्या ऑक्टोबरमध्ये हे उत्पन्न १२ कोटींपर्यंत आले आहे.

Rising fuel prices will make the journey of the common man more expensive | इंधन दरवाढीमुळे महागणार सर्वसामान्यांच्या लालपरीचा प्रवास 

इंधन दरवाढीमुळे महागणार सर्वसामान्यांच्या लालपरीचा प्रवास 

Next

मुंबई : इंधन दरवाढीमुळे  होणारे नुकसान भरून काढण्यासाठी येत्या काही दिवसात एसटी महामंडळ भाडेवाढ करण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव एसटी महामंडळाने तयार केला असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. 
एसटी महामंडळाने २०१८ मध्ये १८ टक्के भाडेवाढ केली होती. त्यानंतर कोरोनामुळे कोणतीही भाडेवाढ केलेली नाही. एसटीचे दररोज २१ कोटींचे उत्पन्न कोरोनामुळे काही लाखांवर आले होते. सध्या ऑक्टोबरमध्ये हे उत्पन्न १२ कोटींपर्यंत आले आहे. पुरेसे उत्पन्न नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांना वेतनासाठी राज्य सरकारची मदत घ्यावी लागत आहे. एसटी महामंडळाच्या १५ ते १६ हजार बस डिझेलवर धावत आहेत. त्यापैकी सध्या १२ हजार गाड्या धावत आहेत. त्यासाठी दररोज ९.७७ लाख लिटर डिझेल लागते. एसटीच्या महसुलाच्या ३८ टक्के महसूल हा इंधनासाठी खर्च होत आहे, असे सूत्रांनी सांगितले.
२०१८ मध्ये एसटीची भाडेवाढ केली, तेव्हा डिझेल प्रतिलिटर ७२ रुपये होते. आता डिझेल १०४ रुपये प्रतिलिटर झाले आहे. तसेच कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. उत्पन्नात मोठी घट झाल्याने एसटी महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला होता. येत्या काही दिवसात त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

राज्यभरात सापडले ३१८ फुकटे प्रवासी
एसटी महामंडळाने राबविलेल्या विनातिकीट प्रवासविरोधी मोहिमेत राज्यात ३१८ प्रवासी सापडले असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. राज्यात विविध विभागांने केलेल्या कारवाईत २,२३,५०० बसची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये ३१८ प्रवासी विनातिकीट आढळले. 
 या प्रवाशांकडून ६४,५०० रुपयांचा दंड आणि प्रवासीभाडे वसूल करण्यात आले आहे. प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्याकरिता व विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर यादरम्यान एसटी महामंडळाकडून तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विभागातील मार्ग तपासणी पथकातील व आगारातील सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी यांचाही समावेश आहे. 
यावेळी विनातिकीट प्रवास करताना प्रवासी आढळल्यास त्यांच्याकडून चुकविलेल्या भाड्याव्यतिरिक्त प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम किंवा रुपये १०० यापैकी जी रक्कम अधिक असेल ती दंड म्हणून वसूल करण्यात आली.

Web Title: Rising fuel prices will make the journey of the common man more expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.