मुंबई : अरबी समुद्रावर निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांची वारंवारता, कालावधी आणि तीव्रता अलीकडे वाढली आहे. २००१ ते २०१९ या कालावधीत अरबी समुद्रावरील चक्रीवादळांच्या वारंवारतेत ५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत असल्यामुळेच, अरबी समुद्रातील चक्रीवादळांमध्ये वाढ झाली असल्याचे पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार समोर आले आहे.
स्प्रिंगर या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या ‘चेंजिंग स्टेटस ऑफ ट्रॉपिकल सायक्लॉन्स ओव्हर द नॉर्थ इंडियन ओशन’ या शोधनिबंधात बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचा कालावधी, वारंवारता, वितरण, निर्मितीचे स्थान व १९८२ ते २०१९ या ३८ वर्षांच्या कालावधीतील स्थिती या मापदंडांच्या आधारे वेध घेण्यात आला आहे.
पूर्वी अरबी समुद्रापेक्षाही बंगालच्या उपसागरावर उष्णकटिबंधीय चक्रीवादळ मोठ्या प्रमाणात निर्माण होत असत. आता त्यात ८ टक्क्यांनी घट झाली आहे. आता अतितीव्र वादळांचे प्रमाण १५० टक्क्यांनी वाढले आहे. २०१५ साली चपळ आणि मेघ ही अतितीव्र चक्रीवादळे एकाच महिन्यात लागोपाठ आली होती. २०१८ साली आलेल्या ७ चक्रीवादळांपैकी ३ चक्रीवादळे अरबी समुद्रावर निर्माण झाली होती. २०१९ साली निर्माण झालेल्या सर्वाधिक ८ चक्रीवादळांपैकी ५ चक्रीवादळे अरबी समुद्रात निर्माण झाली होती. २०२० साली आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे इतिहासात प्रथमच मुंबईजवळ किनारी भागात जमीन खचल्याची घटना घडली. या वर्षी आलेले तौक्ते चक्रीवादळ आतापर्यंतचे सर्वाधिक तीव्र वादळ असून, याचा परिणाम देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील ४ राज्यांमध्ये दिसून आला.
१९८२ ते २००० या काळात ९२ उष्णकटिबंधीय चक्रीवादळे निर्माण झाली. त्यापैकी ३० टक्के अतितीव्र होती. २००१ ते २०१९ या काळात चक्रीवादळांची संख्या १०० पर्यंत पोहोचली. अरबी समुद्रावरील चक्रीवादळांसाठी मे-जून हा पहिला तर ऑक्टोबर-नोव्हेंबर हा दुसरा मोक्याचा कालावधी ठरला. फेब्रुवारी आणि ऑगस्ट वगळता बंगालच्या उपसागरावर वर्षभराचा काळ चक्रीवादळांसाठी अनुकूल राहिला. मात्र, एप्रिल-मे आणि नोव्हेंबर हा मोक्याचा कालावधी ठरला. गेल्या २ दशकांपासून अरबी समुद्रावरील चक्रीवादळांच्या एकूण कालावधीत ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कोट :
समुद्रपृष्ठाचे वाढते तापमान व जागतिक तापमानवाढीमुळे वाढलेले आर्द्रतेचे प्रमाण यामुळे अरबी समुद्रावर निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांचे प्रमाण वाढले आहे. चक्रीवादळांची केवळ संख्याच वाढत नाही, तर अरबी समुद्रावरील चक्रीवादळांचे आकृतिबंध आणि स्वरूपही बदलत आहे. चक्रीवादळांच्या तीव्रतेसह त्यांचा एकूण कालावधीही वाढला आहे.
- डॉ.रॉक्सी मॅथ्यू कोल, वरिष्ठ शास्त्रज्ञ, आयआयटीएम.