मुंबई किनारपट्टीवर टारबॉलच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब; स्वप्नजा मोहिते यांचं मत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 05:46 PM2021-08-09T17:46:21+5:302021-08-09T17:47:31+5:30
यावर्षी ही भरतीच्या लाटांमुळे असे टार बॉल्स मोठ्या प्रमाणावर जुहू आणि गिरगाव किनाऱ्यावर वाहून आले आहेत.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई- जुहू समुद्रकिनाऱ्यावर तेलकट टार बॉल्स सापडण्याचे हे सलग चौथे वर्ष आहे. 10 ते 20 सेंटीमीटर व्यासाचे ब्लॅक ऑइलचे टारबॉल गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील किनारपट्टीवर परत आले आहेत. जूहू समुद्र किनाऱ्याच्या विविध भागांमधून जवळपास 6,000 किलो हे असे चिकट तेलकट टार बॉल्स स्वच्छ करण्यात आले आहेत. पावसाळ्यात असे हे तेलकट टार बॉल्स किनाऱ्यांवर वाहून येतात. पण यावर्षी हे प्रमाण जरा जास्तच जाणवत आहे.
यावर्षी ही भरतीच्या लाटांमुळे असे टार बॉल्स मोठ्या प्रमाणावर जुहू आणि गिरगाव किनाऱ्यावर वाहून आले आहेत. 2019 मध्ये, वर्सोवा आणि दादर समुद्रकिनाऱ्यांवर तसेच मरीन ड्राइव्हच्या किनाऱ्यावरही टारबॉलची नोंद झाली होती. गेल्या चार वर्षांपासून मुंबईच्या किनारपट्टीवर टारबॉलच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब आहे असे मत रत्नागिरी येथील मत्स्यमहाविद्यालयाच्या मत्स्य जीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका स्वप्नजा मोहिते यांनी लोकमतकडे व्यक्त केले.
वाढत्या तापमानामुळे ते आणखी प्रवाही आणि चिकट बनत जातात. यातली हायड्रोकार्बन्समुळे त्वचेवर ऍलर्जी सारखी रिअक्शन येऊ शकते. समुद्रातील जलचर, पक्षी यांच्यासाठी हे टार बॉल्स खुच घातक ठरू शकतात. त्यामुळे अशी टार बॉल्सचे थर बसलेली वाळू गोळा करून घेण्याशिवाय काही पर्याय राहत नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.
समुद्राच्या पृष्ठभागावर पसरलेले क्रूड ऑइल लाटांमुळे घुसळले जाऊन तसेच पाण्यातील घटकांची रासायनिक प्रक्रिया होऊन त्याचे रूपांतर या टार बॉल्समध्ये होते. पावसाळ्यात किनाऱ्याकडे ढकलले गेल्याने हे चिकट गोळे वाळूवर फेकले जातात आणि त्याचा थर वाळूवर जमा होतो. जेव्हा ते वाळू आणि कचरा यांत मिसळतात, तेव्हा त्यांना काढणे अत्यंत कठीण होते. जेव्हा क्रूड ऑइल समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगते तेव्हा त्याची भौतिक वैशिष्ट्ये बदलतात. गळतीच्या पहिल्या काही तासांमध्ये, तेल पातळ स्लीकमध्ये पसरते. वारा आणि लाटा यांच्यामुळे या ऑइल स्लिक खूप विस्तृत क्षेत्रात विखुरलेल्या जातात.
विविध भौतिक, रासायनिक आणि जैविक प्रक्रिया तेलाचे स्वरूप बदलतात. या प्रक्रियांना साधारणपणे "वेदरिंग" म्हणतात. सुरुवातीला या ऑइल स्लिक मधील हलक्या द्रव्यांचे बाष्पीभवन होऊन जाते. पण यातील जड द्रव्यांचे चॉकोलेट पुडिंगसारखे इमल्शन तयार होते. हे अतिशय घट्ट आणि चिकट असते. लाटा आणि वर यामुळे हे इमल्शन घुसळले जाऊन त्याचे लहान मोठे टार बॉल्स तयार होतात. असे टार बॉल्स लवकर नष्ट होत नाहीत आणि ते कित्येक किलोमीटर वाहून नेले जातात अशी माहिती स्वप्नजा मोहिते यांनी शेवटी दिली.